नाशिकमधून नववर्ष स्वागतासाठी दोन हजार ८४ टन द्राक्षांची निर्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grapes

सात हजार टन द्राक्षे निर्यातदारांच्या प्रतीक्षेत

नाशिकमधून नववर्ष स्वागतासाठी दोन हजार ८४ टन द्राक्षांची निर्यात

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी द्राक्ष (grapes) पंढरी नाशिक जिल्ह्यातील(nashik district) ‘अर्ली’ बागलाण, देवळा, मालेगाव पट्यातून दोन हजार ८४ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. उत्पादकांच्या माहितीनुसार अजून सात हजार टन द्राक्षे निर्यातदारांच्या प्रतीक्षेत आहेत. ‘अर्ली‘ द्राक्षांना अवकाळी पावसाचा दणका बसण्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. या महिन्याच्या सुरवातीला पाऊस होण्यापूर्वी ९० ते ११० रुपये किलो भावाने द्राक्षांची निर्यातीसाठी खरेदी करत होते. अवकाळीच्या दणक्यानंतर मात्र ७५ ते ८५ रुपयांपर्यंत निर्यातक्षम द्राक्षांचा भाव घसरला आहे.

`अर्ली‘ द्राक्षांच्या पट्यात अडीच हजार एकरावर उत्पादन घेतले जाते. एकरी सात ते आठ टन उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ मिळत नाही. गेल्यावर्षी पावसाच्या दणक्यात द्राक्षे सापडल्याने डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १ हजार टनापर्यंत निर्यात होऊ शकली होती. सोमवार (ता. २०) अखेर १२४ कंटेनरभर द्राक्षांची निर्यात यंदा झाली आहे. त्यातील बहुतांश द्राक्षे रशियाला पाठवण्यात आली आहेत. याशिवाय दुबई, युक्रेन आणि श्रीलंकेत निर्यातदारांनी द्राक्षे पाठवली आहेत. बांगलादेशसाठी गेल्यावर्षी निर्यातदारांनी जागेवर ७५ रुपये किलो भावाने द्राक्षांची खरेदी केली होती. यंदा ४५ ते ६० रुपये शेतकऱ्यांना मिळताहेत. चांदवडच्या पूर्व भागातील द्राक्षे यापुढील काळात रशियाकडे रवाना होतील, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हंगामात द्राक्षे बागांमध्ये

डिसेंबरमध्ये ‘अर्ली‘ द्राक्षांची निर्यात वेगाने होत असते. यंदा मात्र अजूनही २५ ते ३० टक्के द्राक्षे बागांमध्ये आहेत. पुढील महिन्यात निर्यातीसाठी २० ते ३० टक्के द्राक्षे तयार होतील. अवकाळी पावसाच्या दणक्यात नुकसानीचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. सुरवातीला घडांमधील मणी फारसे तडकणार नाहीत, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र वातावरणात सुधारणा न झाल्याने नुकसानीचे प्रमाण वाढत गेले आहे. पावसानंतर द्राक्षांची निर्यात थांबल्यात जमा होती. पण अजूनही निर्यातीसाठी द्राक्षे विकत घेण्याचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे निर्यातीचा वेग काहीसा मंद आहे.

रशियामधून रासायनिक औषधांच्या उर्वरित अंशमुक्तसाठी दोन घटकांच्या प्रमाणपत्रांचा आग्रह काही निर्यातदारांकडून धरला जात आहे. खरे म्हणजे, हंगाम सुरु असताना प्रमाणपत्राची मागणी करणे उचित नाही. आता चाचणी करायची म्हटल्यावर त्यात काही चूक झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा किलोला दहा रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागेल. द्राक्ष बागायतदार संघाच्या पिंपळगावमधील मेळाव्यात या प्रश्‍नी चर्चा करून सरकारकडे दाद मागितली जाणार आहे.

- भारत सोनवणे, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ

टॅग्स :NashikGrapes