Sugarcane Crop : कारखान्यांकडून उसाची शोधाशोध; उसाचे क्षेत्र घटले, यंदा ‘धुराडे’ होणार लवकर बंद!

Sugarcane crop
Sugarcane cropesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ऊसतोडणीसाठी ठेकेदार, कामगार यांच्याकडून होणारी आर्थिक पिळवणूक व अपेक्षित दर मिळत नसल्याने यंदा निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस लागवडी कडे पाठ फिरविली.

उसाचे माहेरघर असलेल्या निफाडच्या गोदाकाठ परिसरात ३० टक्के क्षेत्र घटले आहे. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे धुराडे यंदा लवकरच बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र संपत आले असून अनेक कारखान्यांनी उसाची शोधाशोध सुरू केली आहे. ( Extraction of sugarcane by factories Sugarcane area decreased nashik news)

गेल्या वर्षी शेतकऱ्यांना रडविणाऱ्या कारखानदारांना यंदा मात्र झटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच शोधाशोधीचे चित्र आहे. गेल्यावर्षी ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती.

त्यात ऊसतोड मजुरांनीही शेतकऱ्यांची लुबाडणूक केली. मार्च उजाडला तरीही उसाचे क्षेत्र संपत नव्हते. त्यामुळे ऊस शिल्लक राहतो की काय अशी अवस्था झाली होती. ऊसतोड मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कारखानदारांच्या दारात चकरा माराव्या लागत होत्या.

वारंवार विनवणी करूनही ऊसतोड मिळत नव्हती. ऊसतोड मुकादमासह मजुरांनी शेतकऱ्यांची आर्थिक फरफट केली. जून महिन्यापर्यंत कारखाने सुरू ठेवल्याने उसाचे क्षेत्र संपले. यंदा मात्र यापेक्षा उलट परिस्थिती असल्याचे संकेत दिसत आहेत.

उसाचा भाव बे भरवसे

ऊस तोडणीला शेतकऱ्यांपासून पैसे उकळले जायचे. बाजारभावही बे भरवसे आहे. हतबल होऊन आम्ही उसाऐवजी कांदा व गव्हाचे पिके घेतले असल्याचे करंजगावचे शेतकरी शहाजी राजोळे, युवराज कोटकर, योगेश राजोळे यांनी सांगितले.

Sugarcane crop
Nashik News : शेवटी बापाचं काळीज ते...स्वतः आगीत होरपळत मुलांचा वाचवला जीव

धावाधाव सुरू

यंदा उसाचे क्षेत्र घटले आहे. गेल्या वर्षी झालेल्या मानसिक त्रासाचा फटका यंदा क्षेत्र घटण्यात झाला आहे. त्यामुळे नवीन लागवडही कमी झाली. शिवाय खोडव्यालाही जास्तीचा उतार मिळत नाही. त्यामुळे एकरी उत्पादकता चांगलीच घटली आहे.

नगर मधील अगस्ती, संगमनेर, कोळपेवाडी तर नाशिक जिल्ह्यातील रानवड, कादवा, व्दारकाधीश कारखान्याची ऊस मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. क्षेत्र कमी अन्‌ कारखान्यांची संख्या जास्त, यामुळे कारखानदारांची चांगलीच पळापळ होत आहे.

काही कारखान्यांना शेतकरी ऊस देण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे अनेक कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केलेला नाही. गेल्या वर्षी जूनपर्यंत कारखाने सुरू होते. यंदा मात्र मार्च महिन्यापर्यंत बहुतांश कारखाने सुरू राहण्याचे संकेत आहेत.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Sugarcane crop
Siddharth Hostel Case : सिध्दार्थ वसतीगृह प्रकरणी 3 संशयितांना जामीन मंजूर

उसाचे ३० टक्के क्षेत्र घटले

आठ महिने उसाचे पीक शेतात सांभाळून तोडणीला कारखाने व मजुरांसमोर हात पसरावे लागतात. या पिळवणुकीला कंटाळून गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीला रामराम ठोकला. सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे क्षेत्र असायचे.

त्यात ३० टक्के घट होऊन हे क्षेत्र चार हजार तीनशे हेक्टर पर्यंत यंदा राहिले. उसाऐवजी शेतकऱ्यांनी गहू, कांदा, गाजर, भाजीपाला ही पिके घेण्यास पसंती दिली.

रसवंतीगृहाला पसंती

आठ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन यंदा निफाड तालुक्यात होण्याची शक्यता आहे. त्यातील दोन लाख मेट्रिक टन ऊस रसवंतीगृहाला जाणार आहे. कारखान्यापेक्षा अधिकचा दर, रोख रक्कम व बांडीसह वजन मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना येथील रसवंतीगृहांना ऊस देण्यास पसंती दिली आहे.

"उसाचे क्षेत्र तर घटलेच आहे शिवाय लांबलेल्या पावसाने उत्पादन क्षमता कमी झाली आहे.एकरी 60 ऐवजी 30-35 टनच उसाचे उत्पादन झाले आहे.स्वाभाविकच त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळपावर झाला आहे. ऊस अभावी यंदा दोन महिने अगोदर म्हणजे मार्च च्या पहिल्याच आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम थांबू शकतो."

- रामभाऊ माळोदे, अध्यक्ष, रानवड साखर कारखाना, रानवड

Sugarcane crop
Nashik NMC News : विकास शुल्क वाढल्यास घरांच्या किमती वाढणार! पाचपटीने शुल्क वाढविण्याची तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com