
पेठमध्ये अतिवृष्टी अन् सुरगाणा-त्र्यंबकेश्वरमध्ये दमदार हजेरी
नाशिक : मॉन्सून पावसाची (Monsoon Rain) गेल्या चोवीस तासामध्ये पेठ तालुक्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. याशिवाय सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून शिरसगाव (ता. त्र्यंबकेश्वर) भागातील पुलाचे बांधकाम साहित्य वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठा २८ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. गेल्यावर्षी धरणसाठा २७ टक्के उपलब्ध होता. (Extreme rainfall in Peth and strong presence in Surgana Trimbakeshwar Nashik Monsoon Latest News)
नाशिक शहर आणि परिसरात आज दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता. अधूनमधून पावसाची जोर वाढत राहिला. इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात ३७.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सातत्य राखले असले, तरीही इगतपुरी तालुक्यातील आतापर्यंत ३९.१ टक्के पाऊस झाला आहे. इगतपुरीचा अपवाद वगळता इतर तालुक्यातील पावसाची टक्केवारी पन्नास आणि शंभर टक्क्यांच्यापुढे पोचली आहे.
आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात तालुक्यातील आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी दर्शवते) : मालेगाव-३.६ (१६८.५), बागलाण-१.२ (१११.३), कळवण-१६.५ (१११.३), नांदगाव-४ (१३३), सुरगाणा-६२.५ (६९.७), नाशिक-१२.८ (७३.४), दिंडोरी-२३.८ (११६.७), पेठ-९७.४ (९३.५), निफाड-६.९ (१०२.१), सिन्नर-२.२ (९८.९), येवला-१९.२ (७२.२), चांदवड-२.१ (१६२.८), त्र्यंबकेश्वर-४२.८ (६३.८), देवळा-१.२ (१२५).
९ धरणात गेल्यावर्षीपेक्षा अधिक साठा
जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम अशा एकुण २४ धरणांपैकी ९ धरणांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा आतापर्यंत अधिकचा जलसाठा झाला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गेल्यावर्षी ३५ टक्के, तर आता २८ टक्के साठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षीपेक्षा अधिकचा जलसाठा उपलब्ध असलेल्या धरणांमध्ये गौतमी गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, मुकणे, कडवा, चणकापूर आणि पूनंदचा समावेश आहे.
मोठ्या धरणांपैकी करंजवणमध्ये १२, दारणामध्ये ३७, मुकणेमध्ये ४०, कडवामध्ये १९, चणकापूरमध्ये २०, तर गिरणामध्ये ३४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धरणांच्या गंगापूर समूहात २३, पालखेड समूहात २०, दारणा समूहात ५८, गिरणा खोरे समूहात २३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पावसात राहिल्याने धरणसाठा वाढत असताना खरीपाच्या पेरण्यांचा वेग वाढण्यासह टंचाईची स्थिती कमी होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा: शिवसेना संपू नये, अशी भावना महाराष्ट्रातील प्रत्येकाची : छगन भूजबळ
पावसाच्या ठळक नोंदी
० गोदावरी नदी नाशिकमधील गटारीच्या पाण्यामुळे तुडूंब भरली
० नाशिकमधील कुंभारवाडा भागातील बंद घराची संरक्षक भिंत कोसळली
० द्वारका भागात गटारीचे पाणी थेट पोचले घरामध्ये
० सुरगाणा तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर
० देवळा, नांदगाव तालुक्यात रिमझिम पाऊस
० बागलाणच्या पूर्व भागात दमदार पावसाची प्रतीक्षा
० समृद्धी महामार्ग अंडरपास काळुस्ते-घोटी रस्त्यावर तळे
हेही वाचा: Nashik : नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या कमानीस काही महिन्यातच गळती
Web Title: Extreme Rainfall In Peth And Strong Presence In Surgana Trimbakeshwar Nashik Monsoon Latest News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..