खोट्या अर्जाचे गूढ कायम!
मुंबई उच्च न्यायालयाकडून सराइतांच्या गुन्ह्याचा खटला रद्द
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : कारागृहात मारहाण, धमकी आणि पोलिसांची बदनामी करण्यासाठी खोटा अर्ज तयार केल्याच्या आरोपांप्रकरणी दाखल गुन्हा आणि खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. फिर्यादी आणि संशयितांमध्ये समझोता झाल्यानंतर न्या. मिलिंद जाधव यांनी हा निर्णय दिला. मात्र, कथित खोटा अर्ज नेमका कोणी तयार केला, याचे गूढ कायम आहे.
अंबड पोलिस ठाण्यात दाखल मोक्का गुन्ह्यात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेल्या महेश गोकूळ सोनवणे उर्फ चिमण्या (वय २३) याने काही जणांविरुद्ध हल्ल्याची फिर्याद दिली होती. कारागृहात असताना हर्षद पाटणकर, प्रकाश उर्फ बॉस लोंढे, दीपक उर्फ नाना लोंढे आणि वकील यतीश देसले यांनी गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली व कोऱ्या कागदावर जबरदस्तीने सह्या घेतल्या. त्यानंतर पोलिसांविरोधात खोटा अर्ज करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्याने केला होता.
या प्रकरणी हर्षद पाटणकर व इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, फिर्यादी आणि संशयितांमध्ये समझोता झाला. २४ जूनला न्यायालयात संमती प्रतिज्ञापत्र सादर करून असा कोणताही गुन्हा घडला नसल्याचे नमूद करण्यात आले.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ५२८ अंतर्गत अधिकारांचा वापर करून न्यायालयाने याचिका मंजूर केली आणि गुन्हा व खटला रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच, अर्जदारांना वैद्यकीय कारणासाठी दोन सेवाभावी संस्थांकडे प्रत्येकी १० हजार रुपये दोन आठवड्यांत जमा करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे नाशिक रोड सत्र न्यायालयातील खटला रद्द झाला आहे.