Fake Medical Certificate Case : डॉ. सैंदाणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Medical Certificate case

Fake Medical Certificate Case : डॉ. सैंदाणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

नाशिक : पोलिस कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांसंदर्भात दाखल गुन्ह्यात तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. डॉ. सैंदाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, आता यावर पुढील महिन्याच्या ८ तारखेला सुनावणी होणार आहे. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेमुळे या प्रकरणाचा पोलिस तपासही थंडावला आहे. (Fake Medical Certificate Case Dr Saindane hearing on pre arrest bail application adjourned Nashik News)

पोलिस कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भात बृहन्मुंबई, पालघर व जळगाव येथील २१ पोलिस कर्मचाऱ्यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले होते. सदरची बाब तपासात उघडकीस आल्याने नाशिक तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी २१ पोलिस कर्मचाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांसह कर्मचारी व खासगी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली. तर तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. किशोर श्रीवास यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्या अटक पूर्व जामीन अर्जांवर सुनावणी होऊ शकलेली नाही. सोमवारी (ता. १४) सुनावणी न होता पुन्हा लांबणीवर पडली असून, येत्या ८ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : मालेगावी अल्पवयीन मुलीचे अपहरण, सुटका अन्‌ संशयिताला अटक

तपासही थंडावला

दरम्यान, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांची पोलखोल झाल्याने सदरील प्रकरणाने नाशिक जिल्हा रुग्णालय चर्चेत आले होते. याप्रकरणी तालुका पोलिसांनी अधीक्षक कार्यालयातील लिपिकासह जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन, खासगी डॉक्टर्स व आणखी दोघे, असे पाच संशयितांना अटक केली.

तर गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. निखिल सैंदाणे हे पसार आहेत. त्यांचा शोध घेण्यात तालुका पोलिसांना अपयश आले आहे. तर दुसरीकडे नव्याने काहीही हाती लागत नसल्याने पोलिस तपासही थंडावला आहे. मात्र, पोलिस व जिल्हा रुग्णालयाच्या आवारात यासंदर्भात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.

हेही वाचा: Dhakambe Robbery Case : ग्रामीण पोलिस दरोडेखोरांच्या मागावर गुजरात, मध्यप्रदेशात!