रेल्वेने प्रवास करणारा "गोदावरीचा राजा'! रेल्वेसेवा बंद तरी बोगीत स्थापना

MNM20A01409_pr.jpg
MNM20A01409_pr.jpg

नाशिक /मनमाड :  शहर परिसरात गणरायाचे आगमन होऊन स्थापना करण्यात आली. शहरातील मानाच्या गणपतीसह मोठे ५ तर लहान ३५ सार्वजनिक मंडळ व गणेशभक्तांनी घरात गणेशाची स्थापना केली. कोरोनाचे सावट असूनही मनमाड - कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसने प्रवास करणारा गोदावरीचा राजाची रेल्वे सेवा बंद असली तरी यार्डात असलेल्या बोगीत स्थापना करण्यात आली. तर मनमाडच्या मानाच्या श्रीनिलमनी गणपतीची यंदा पुणेरी मिरवणूक रद्द करण्यात आली.


गणेश मंडळांमध्ये मोठी घट
यंदा मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनमाड शहर परिसरात यंदा अनेकांनी मिरवणूक न काढता गणेश स्थापना केली. अनेक नागरिकांनी कुटुंब सहपरिवार जात ‘गणेश’ची मूर्ती आणली. विधिवत पूजा करत गणेशभक्तांनी घरात गणेशाची स्थापना केली. शहरात गेल्या वर्षी १५१ गणेश मंडळ होते. मात्र यंदा ५ मोठे मंडळे, ३५ लहान मंडळांनी गणेश स्थापना केली. 


गोदावरी राजाचा जयघोष 
गणेशोत्सव हा अवघ्या महाराष्ट्राचा उत्सव. मात्र मनमाडमध्ये एक अनोखा गणेशोत्सव पाहायला मिळतो. अगदी कोणालाही खरे वाटणार नाही की लाडका गणराया रेल्वेने प्रवास करतो म्हणून, पण अगदी सत्य आहे रेल्वे गाडीचा हॉर्न वाजताच बाप्पाचा जयघोष सुरू होते. दररोज हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणाऱ्या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सवाची राज्यभर ख्याती आहे. त्यामुळे रेल्वे गाडीने दहा दिवस प्रवास करणारा भारतातील एकमेव गणेश म्हणून गोदावरी राजाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 


सर्वधर्मीय चाकरमान्यांची उपस्थिती
कोरोना संकटामुळे रेल्वे गाड्या बंद असल्याने गोदावरी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वधर्मीय चाकरमान्यांनी कोरोनाचे सावट असले तरी यंदाही अतिशय श्रद्धेने यार्डात उभ्या असलेल्या गोदावरी एक्सप्रेसमध्ये गोदावरीच्या राजाची प्रभारी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या हस्ते आरती करत स्थापना झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैरे, मुकेश निकाळे, संदिप व्यवहारे, भूषण पवार, स्वप्निल म्हस्के, मंगेश जगताप, राजू भडके, चेतन मराठे, गोरख खैरे, सुरज चौधरी, शेखर थोरात, धनंजय आव्हाड, ललित धांदल, अमन म्हसदे, अशोक बिहारी, विवेक शेजवळ, विशाल आहिरे, उमेश देसाई, मच्छिन्द्र सांगळे आदींनी परिश्रम घेतले.


श्री निलमणीचे ऑनलाईन दर्शन
शहरात मानाचे स्थान असलेल्या वेशीतील श्री निलमणी गणेशाची पालखीतून पुणेरी पध्द्तीने मिरवणुक यंदा काढली नाही. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेतला. श्री निलमणीच्या पार्थिव मुर्तीची स्थापना कोरोना विषाणु संकटमुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून सामाजिक अंतर ठेऊन साध्या पध्दतीने केली. मंडळाचे सदस्य सौ व श्री सचिन व्यवहारे यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना झाली. कोरोना संकट पहाता ट्रस्ट तर्फे श्री नीलमणिची महाआरती दररोज रात्री ८ वाजता shri nilmani ganesh mandir manmad या फेसबुक पेजवरुन गणेश भक्तांना लाइव पाहता येणार आहे. 


शिल्लक औषध संकलन
या स्थापना धार्मिक कार्यक्रमात श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त नितीन पांडे, शेखर पांगुळ, गोविंद रसाळ, किशोर गुजराथी आदी गणेशभक्त सहभागी झाले होते. सामाजिक कार्य म्हणून ट्रस्टकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गरीब रुग्णांसाठी शिल्लक औषध संकलन केले जाणार आहे. नागरिकांनी व गणेशभक्तांनी आपल्याकडील वापरात नसलेली परंतु एक्सपायरी डेट शिल्लक असलेली औषधे देण्यासाठी ८६६८९५४०६० या क्रमांकवर संपर्क करावा, असे या आवाहन करण्यात केले आहे.
 

संपादन : भीमराव चव्हाण
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com