32560
कवठळ : येथील शेतकरी विनोद चौधरी यांच्या शेतावर पिकांची पाहणी करताना प्रांताधिकारी दीपक गिरासे, सोबत शेतकरी, कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी.
पिकांवर रोटाव्हेटर फिरवणाऱ्या
शेतकऱ्याच्या बांधावर प्रांताधिकारी
सकाळ वृत्तसेवा
वडाळी, ता. १५ : पाण्याअभावी २६ एकर क्षेत्रातील उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवावा लागलेल्या शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी प्रांताधिकारी दीपक गिरासे गुरुवारी (ता. १५) थेट शेताच्या बांधावर पोहोचले. या वेळी त्यांनी पाण्याअभावी उद्भवलेल्या गंभीर समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्याला दिलासा दिला.
कवठळ येथील शेतकरी विनोद चौधरी यांची ६० एकर शेती आहे. त्यांपैकी २६ एकरात त्यांनी केळी, पपई आणि ऊस, तर उर्वरित ३४ एकरांत कापूस व मिरचीची लागवड केली होती. या सर्व पिकांच्या लागवडीसाठी त्यांनी सुमारे २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. मात्र, ऐन गर्दीच्या वेळी शेतातील कूपनलिकेची पाण्याची पातळी अचानक खालावली.हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून ३ लाख रुपये खर्च करून त्यांनी ६०० फुटांपर्यंत नवीन बोअरवेल खोदली. मात्र, पाणी लागले नाही. त्यामुळे पिकांना कसे वाचवावे, या चिंतेत असलेल्या विनोद चौधरी यांनी अखेर अश्रू ढाळत उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवला.
विनोद चौधरी यांनी उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवल्याची धक्कादायक माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक गिरासे हे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचले. प्रांताधिकाऱ्यांनी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.