esakal | पिंपळगाव बाजार समितीत बांगलादेशी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट!
sakal

बोलून बातमी शोधा

farmers are being robbed by bangladesh traders at pimpalgaon  market committee

पिंपळगाव बाजार समितीत बांगलादेशी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट!

sakal_logo
By
दिपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली. बंपर पीक व मागणीअभावी टोमॅटोच्या क्रेटला ९० रुपये असा निचांकी दर मिळाला. खर्चही वसूल होत नसल्याची घाव ओला असताना केलेल्या सौद्यापेक्षा कमी दराने व्यापारी शेतकऱ्यांना पैसे देऊन जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करत आहेत. बांगलादेशला टोमॅटो पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पिंपळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट दर कमी केल्यावरून शेतकऱ्याला मारहाण प्रकरणाने कळीचा मुद्दा बनला आहे.

टोमॅटोची राजधानी अशी पिंपळगाव बाजार समितीची ख्याती आहे. दुबई, बांगलादेश अशा परदेशीवारीला पिंपळगावचा टोमॅटो जातो. सभापती दिलीप बनकर यांच्या संकल्पनेतून जोपुळ रस्त्यावर शंभर एकर जागेत सुपरमार्केट उभारणी व शासनाने बाजार समिताला जोडणारा दुपदरी रस्ता साकारल्यानंतर ही बाजारपेठ अधिक गजबजली आहे. सध्या दररोज अडीच लाख टोमॅटो क्रेट विक्रीसाठी येतात.

हेही वाचा: 24 वर्षात पहिल्यांदाच हुकली बाप्पांची मनमाड-मुंबई वारी!

सौद्यापेक्षा कमी रक्कम

सभापती बनकर हे रोख रक्कम, योग्य बाजारभाव व पारदर्शक कारभाराची शिस्त लावण्याचा काटेकोर प्रयत्न करीत असतात. कोठे अनियमितता होत असेल तर त्यावर बाजार समितीचे कर्मचाऱ्यांची नजर असते. असे असतानाही काही व्यापारी रडीचा डाव खेळत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणाहून स्पष्ट होते.

अशी होते शेतकऱ्यांची लूट

टोमॅटो विक्रीसाठी आलेले शेतकरी समितीच्या पहिल्या प्रवेशव्दाराने आत येतात. तेथेच बांगलादेशला टोमॅटो पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांची टोळी उभी असते. शेतकरी टोमॅटो घेऊन आत येताच हे व्यापारी दर्जा न पाहता टोमॅटोचा सौदा करतात. विशेष म्हणजे एका शेतकऱ्याला सात- आठ व्यापाऱ्याकडून पावत्या दिल्या जातात. आकर्षक दर मिळतोय या आशेने शेतकरी पावती घेऊन व्यापाऱ्याच्या गाळ्यावर टोमॅटो देण्यासाठी जातात. पण टोमॅटो खराब असल्याचे कारण पुढे करून ते घेण्यासाठी व्यापारी अडवणूक करतात. दर कमी करावा लागेल तरच टोमॅटो घेतो या व्यापाऱ्याच्या अडवणुकीपुढे शेतकरी हतबल होतो.

हेही वाचा: "तुरुंगात असताना कार्यकर्त्यांना खाली पाहावे लागल्याचे दुःख"

शेतकऱ्याचा नाईलाज होतो…

सायंकाळी पुन्हा लिलाव करण्यासाठी न्यायला व काय भाव पुकारला जाईल याची खात्री नसते. त्यामुळे शेवटी दीडशे रुपयांच्या सौद्यानंतर शंभर रुपयांनी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. या दरम्यान बऱ्याचदा शेतकरी व व्यापारींत वादंग निर्माण होतो. आडतदारही व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहत असल्याने शेतकरी नाडला जातो. हा प्रकार सर्रास सुरू असतो.

सभापतींनी दखल घेण्याची बाब

पिंपळगावच्या बाजार समितीचे संपूर्ण देशभर नाव असून तेथे इथलाच शेतकरी नाडला जात असेल तर त्याची सभापती दिलीप बनकर यांनी अवश्य दखल घ्यावी असा सूर या घटनेनंतर व्यक्त होत आहे. शंभर एकर जागेत अद्ययावत बाजार समिती उभारून सभापती बनकर यांनी ड्रीम प्रोजेक्ट उभा केला. दुष्ट लागावी असे कामकाज बाजार समितीचे आहे, त्याला अशा घटनांनी नख लागू नये ही शेतकरींची अपेक्षा आहे.

हेही वाचा: १३ वर्षांपासून मोईन खानकडून बाप्पाची भक्ती; इतरांसाठी ठरतेय आदर्श

loading image
go to top