Nashik News : सिन्नरलाच करा भाजीपाल्याचे लिलाव! स्थानिक शेतकऱ्यांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

market yard of fruits and vegetables

Nashik News : सिन्नरलाच करा भाजीपाल्याचे लिलाव! स्थानिक शेतकऱ्यांची मागणी

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतात, मात्र स्थानिक बाजार समितीत लिलावाची सुविधा नसल्याने त्यांना नाशिक किंवा घोटी, निफाडला धाव घ्यावी लागते. यात त्यांचा वेळ आणि पैसाही जातो.

सिन्नर बाजार समितीने स्थानिक पातलीवर भाजीपल्याच्या लिलावाची व्यवस्था करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. आजपर्यत अनेकदा मागमई होऊनही लोकप्रतिनिधी आणि बाजार समितीने याकडे दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा: Nashik News : GPO कार्यालयाचे 8 ते 8 काम सुरू; या प्रकारे होईल काम...

तालुक्यात अनेक ठिकाणाहून भाजीपाल्याची स्थानिक आठवडे, रोजच्या बाजारपेठेत आवक सुरू असते. मात्र हक्काची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी लिलावासाठी इतरत्र धाव घेतात. सध्या भाजीपाला, फळभाजींच्या क्षेत्रात वाढ होत आहे.

चांगले उत्पन्न मिळत असल्याने नदीकाठी तसेच बागायती क्षेत्रात भाजीपाला, फळभाजी लागवड केली जात आहे. या भाजीपाल्याला अथवा फळभाजीला स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यामुळे चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल अशी मागणी होत आहे.

अनेक गावातील मिरची, काकडी ,टोमॅटो बाजारात प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात गावात टोमॅटोसह कलिंगड, मिरची सहभाजीपाला घेतला जातो. वडांगळीसह देवपुर, फरदापूर, पांढुर्ली, वावी, खडांगळी, ठाणगाव आदी भागातही भाजीपाला लागवड केली जाते. या भाजीपाल्याला बाजारपेठ उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

बाजारपेठ नसल्याने नाशिक मुंबई पुणे, वाशी येथील घाऊक व्यापारी शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेतात. मालाला योग्य दर मिळत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे तालुक्यात सध्या अंदाजीत मिरची आणि टॉमेटोचे दोन हजार हेक्टर क्षेत्र, कलिंगड १०० हेक्टर, वांगी १० हेक्टर क्षेत्र, दुधी भोपळा ४.१ हेक्टर क्षेत्र, भेंडी १४.९ हेक्टर, १५ हेक्टरवर काकडी आदी भाजीपाल्याची लागवड झालेली आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळभाजींचे उत्पादन होत आहे. मात्र या शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादन कवडीमोल भावाने विकावे लागते.

हेही वाचा: Agriculture News : वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार; पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणी

''अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते, परंतु विक्रीसाठी नाशिकला जावे लागते. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने सिन्नर शहरात सर्व सुविधायुक्त दैनंदिन भाजीपाला लिलाव सुरू केल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल.'' - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना.