
Nashik News: बाजारात कवडीमोल भाव; रस्त्यावर ओरडून त्यांनी फुकट वाटली कोथिंबिर
मनमाड : शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात असताना मनमाडमध्ये दिलीप सांगळे या शेतकऱ्याने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कोथिंबीरला व्यापारी घ्यायला तयार नसल्याने, त्यांनी नाराज होऊन रस्त्यावर ओरडून ओरडून कोथिंबीर चक्क फुकट वाटली.
कोथिंबीर पिकासाठी त्यांना १५ हजार रुपये खर्च आला. मात्र, पदरात काहीच पडत नसल्याने अखेर त्यांना कोथिंबीर बाजारात फुकट वाटण्याची वेळ आली. अस्मानी-सुलतानी संकटात अडकलेला शेतकरी आता पुरता हवालदिल झाला असून, अगदी पदरमोड करून व प्रसंगी कर्ज घेऊन उभे केलेल्या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली कोथंबिर विक्री होत नसल्याने श्री. सांगळे हैराण झाले.
कोथंबिरीला व्यापारी भाव लावत नसल्याने तिची विक्री होत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या सांगळे यांनी बाजार समितीत कोथांबिर विकण्यापेक्षा ती नागरिकांना फुकट वाटल्यास आशीर्वाद तरी मिळेल, या भावनेने भाजी बाजारात रस्त्यावर उभे राहून ओरडुन ओरडुन ही कोथांबिर नागरिकांना फुकट वाटली.
याबाबत सांगळे म्हणाले की, या कोथिंबीर पिकासाठी १५ हजार रुपये खर्च आला. मात्र, एवढा खर्च करून पदरात काहीच पडले नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. भाव मिळत नसल्याने कोणी व्यापारी खरेदी करत नव्हते. त्यामुळे अखेर कोथिंबीर बाजारात फुकट वाटावी लागली.