
कांद्याच्या घसरत्या दरामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी | Nashik
लासलगाव (जि. नाशिक) : पंधरा ते वीस दिवसांपासून कांद्याच्या दरात रोज घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, आर्थिक डोलारा कोसळल्याने डोळ्यात पाणी आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
एकीकडे महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कांद्याच्या दरात (Onion rate) घसरण होत आहे. कांद्याच्या दरात अशीच घसरण होत राहिली, तर कांद्याचा उत्पादन खर्च निघेल की नाही, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. विशेष म्हणजे महिन्यापूर्वी कांद्याला असलेले भाव व आत्ताचे भाव यात फार मोठी तफावत असल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे लासलगाव बाजार समितीत लाल व उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक होत असते त्या प्रमाणात मागणी कमी झाल्याने कांद्याच्या दरात घसरण चालू आहे. येणाऱ्या काळात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यास कांद्याचे दर कोसळण्याची भीती आहे. आजच्या भावामुळे उत्पादन खर्चही निघणार नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
हेही वाचा: रासायनिक औषधाने द्राक्षबागांचे नुकसान; कृषी विभागाकडून पंचनामे
उन्हाळ कांद्याची ५५०० क्विंटल आवक
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (ता. ८) लाल कांदा ४८० नग, सात हजार ५०० क्विंटल झाली असून, कमीत कमी भाव ४०० रुपये, जास्तीत जास्त भाव ९३१ रुपये, तर सरासरी भाव ७५१ रुपये होता. उन्हाळ कांद्याचे ३७० नग, पाच हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, कमीत कमी भाव ६०० रुपये, जास्तीत जास्त भाव एक हजार २१५ रुपये, तर सरासरी भाव एक हजार ४० रुपये होता.
हेही वाचा: ''चूलाना धूर परवडना पण...'' गॅस दरवाढीने महिलांचे बजेट कोलमडले
"सततच्या कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कांदा लागवड साठवणूक व विक्री व्यवस्थापन यामध्ये बळीराजाला अनेक अस्मानी सुलतानी संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच महागडी खते, वाढते इंधनाचे भाव, नियमित विजेचा प्रश्न याचाही फटका बळीराजाला बसला आहे. त्यात कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राने विविध योजनांमार्फत दिलासा द्यावा."
- राजाबाबा होळकर, कांदा उत्पादक शेतकरी, लासलगाव
Web Title: Farmers In Trouble Due To Falling Price Of Onion Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..