esakal | त्वरीत विक्री अन् रोख पैसा यामुळे शेतकऱ्यांची मक्या ऐवजी तुरीला पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Tur

त्वरीत विक्री अन् रोख पैसा यामुळे शेतकऱ्यांची तुरीला पसंती

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : देवळा पूर्व भागात ओल्या तुरीच्या शेंगांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. मका पिकाला पर्याय म्हणून या भागातील बहुतांश शेतकरी तुरीची लागवड करत ओल्या तुरीच्या शेंगांची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. सध्या या शेंगांना सरासरी ४५ ते ५५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.

विक्री लगेच होते अन् रोख पैसा मिळतो

खरीप हंगामातील द्विदल वर्गातील तूर हे पीक तसे दुर्लक्षित होते. परंतु गुजरात राज्यातून तुरीच्या ओल्या शेंगांची मागणी ओळखत कळवण व देवळा भागातील काही शेतकऱ्यांनी तूर लागवडीचा पर्याय निवडला. त्यातून चांगला पैसा मिळू लागल्याने आता अनेक शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. बरेचशे शेतकरी घरीच बियाणे तयार करत एप्रिल- मे महिन्यात या हायब्रीड तुरीची लागवड करतात. सहा महिन्यांचे पीक असल्याने सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात या तुरीच्या ओल्या शेंगा तोडत त्यांची विक्री केली जाते. या शेंगांची खरेदी करण्यासाठी कळवण-देवळा रस्त्यावर अनेक व्यापारी टप्याटप्यावर वजनकाट्यासह उपलब्ध असतात. रोख पैसा असल्याने व आडत-हमाली असे काही नसल्याने खरेदी- विक्री व्यवहार लगेच होतात. जो व्यापारी जास्त भाव देईल, त्यास विक्री केली जाते. मागणी वाढली तर १०० रुपये किलोपर्यंत भाव मिळतो. सध्या ४५ ते ५५ रु. प्रतिकिलो भाव मिळत आहे.

हेही वाचा: कांदा निर्यातबंदीच्या अफवेचे पडसाद! 500 रुपयांची घसरण

गुजरात राज्यात अधिक मागणी

गुजरात राज्यात तुरीच्या ओल्या शेंगांना मोठी मागणी असते. कारण तेथे प्रत्येक भाजीत तुरीचे ओले दाणे टाकतात. तसेच या शेंगा उकडून तेथे आवडीने खाल्ल्या जातात. वाटाणाऐवजी या शेंगांमधील दाणे तेथे वापरतात. व्यापारी वर्गालाही यातून दोन पैसे मिळत असल्याने अनेकजण या शेंगांची खरेदी- विक्री करत रोजगार मिळवताना दिसत आहेत.

''मका पिकासाठी जमिनीला खते जास्त द्यावी लागतात. त्याऐवजी तुरीचे पीक कमी खर्चिक आणि रोख पैसा देणारे ठरत असल्याने आम्ही युवा शेतकरी या पिकालाच प्राधान्य देतो. बियाणे आम्ही घरीच तयार करत तेच वापरतो. या झुडपाची पाने खाली पडून त्यातून पालाश (नत्र) तयार होत जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. दिवाळीसाठी पैसा आल्याचे समाधानही वाटते.'' - दिनेश रौंदळ, युवा शेतकरी, भेंडी (ता. कळवण).

हेही वाचा: शाहीन वादळाचा शेवट उत्तर महाराष्ट्रात; मुसळधार पाऊस शक्य

loading image
go to top