म्हसावद येथे बाप-लेकावर रॉडने हल्ला
गुन्हा दाखल; वीज मोटारीचे बटन बंद केल्यावरून वाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : नळाचे पाणी भरताना वीज मोटरीचे बटण बंद-चालू करण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने बाप-लेकावर लोखंडी रॉड व हातातील कड्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना म्हसावद (ता. जि. जळगाव) येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद ग्रामपंचायतीसमोर असलेल्या बाजारपेठ परिसरात प्रदीप केशव सूर्यवंशी (वय १९) कुटुंबासह वास्तव्यास आहेत. बुधवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रदीप सूर्यवंशी घरात नळाचे पाणी भरण्यासाठी मोटरचे बटण चालू करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले होते. त्यावेळी तेथे निखिल सुनील सूर्यवंशी याने मोटरचे बटण बंद केले. प्रदीप यांनी पुन्हा बटण चालू केले असता निखिलने ते पुन्हा बंद केले. यावरून प्रदीप यांनी, ‘तू मोटरचे बटण का बंद करत आहेस?’ असा जाब विचारला. या क्षुल्लक कारणाचा राग आल्याने निखिल संतापला आणि त्याने घरातून लोखंडी रॉड आणून प्रदीप यांच्या वडिलांच्या उजव्या हाताच्या मनगटावर व पंजावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. त्यानंतर वडिलांना वाचविण्यासाठी प्रदीप यांनी निखिलला अडविण्याचा प्रयत्न केला असता, निखिलने आपल्या हातातील कड्याने प्रदीप यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोराने प्रहार केला.
चौकट
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
प्रदीप यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर जीवेठार मारण्याची धमकी संशयितांनी दिल्याप्रकरणी जखमी प्रदीप सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन निखिल सूर्यवंशी (रा. ग्रामपंचायतीसमोर, बाजारपेठ, म्हसावद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.