भगूरच्या ऑइल मिलवर ‘एफडीए’चा छापा
बोगस सोयाबीन तेलाचा तीन हजार किलोंचा साठा जप्त
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत भगूर येथील पंकज ऑइल मिलवर छापा टाकून साडेपाच लाख रुपये किमतीचा तीन हजार २१० किलो संशयास्पद सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने व सहायक आयुक्त (अन्न) संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भगूर येथील तेल रिपॅकर आस्थापनेची तपासणी करण्यात आली. या वेळी साठवून ठेवलेले रिफाइंड सोयाबीन तेल निकृष्ट व कमी दर्जाचे असल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तत्काळ जप्तीची कारवाई केली. अन्न व प्रशासन विभागाने गुरुवारी (ता. २२) भगूरच्या पंकज ऑइल मिलवर छापा टाकला होता. या वेळी पाच लाख ४७ हजार रुपयांचा निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. ही कारवाई सहायक आयुक्त संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांनी केली.
सणासुदीच्या काळात भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, तसेच सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच नियमानुसार व्यवसाय करावा, असे आवाहन ‘एफडीए’मार्फत करण्यात आले आहे.
जप्त मुद्देमाल
-रिफाइंड सोयाबीन ऑइल (लूज) : २,५०० किलोग्रॅम
-रिफाइंड सोयाबीन ऑइल (डेली युज्ड ब्रँड) : ७१० किलोग्रॅम
एकूण जप्त साठा : ३,२१० किलोग्रॅम (किंमत ५ लाख ४७ हजार रुपये)
फोटो : H33464
नाशिक : भगूर येथील पंकज ऑइल मिलवर धाड टाकून जप्त करण्यात आलेला सोयाबीन तेलाचा साठा.