esakal | तब्बल 15 वर्षानंतर भरला ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे तलाव; गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
sakal

बोलून बातमी शोधा

Khirdi lake

तब्बल पंधरा वर्षानंतर भरला ब्रिटिशकालीन खिर्डीसाठे सिंचन तलाव

sakal_logo
By
सुदाम गाडेकर

नगरसूल (जि. नाशिक) : येवला तालुक्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेला खिर्डीसाठे येथील ब्रिटिशकालीन सिंचन तलाव तब्बल पंधरा वर्षांनंतर यंदा पूर्ण क्षमतेने भरला आहे. धरण क्षेत्रात गेल्या दहा ते बारा दिवसात जोमदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे यंदा तलाव ओसंडून वाहू लागला. त्यामुळे या तलावाच्या लाभक्षेत्रातील खिर्डीसाठे, पिंपळखुटे, आहेरवाडी, जायदरे, लहित, पन्हाळसाठे, नगरसूल, मातुलठाण आदी गावांना पाण्याचा लाभ होणार आहे.

गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

ब्रिटिश राजवटीत १९०२ मध्ये खिर्डीसाठेच्या सर्वात मोठया प्रकल्पाचे काम झाले आहे. मात्र हा परिसर दुष्काळी असल्याने हा तलाव सहसा पूर्ण क्षमतेने भरला नाही. २००६ नंतर यंदा मात्र योग जुळून आला आहे. २००८ ला धरण ९० टक्के भरले होते. २००६ नंतर तब्बल पंधरा वर्षांनंतर तलाव पूर्ण क्षमतेने भरून खळखळून वाहिल्यामुळे लाभ क्षेत्रातील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परिसरातील गावाचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. भरपावसाळ्यात पाण्याचे टँकर सुरू असल्याचे विदारक चित्र बदलणार आहे.

हेही वाचा: कांदेंकडून भुजबळांवर ताणलेली बंदूक शिवसेना की राष्ट्रवादीची?

तलाव पूर्ण भरल्याने यंदा बारमाही पिकांचे उत्पादन

''तब्बल पंधरा वर्षानंतर पाझर तलाव पूर्ण भरल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. मात्र ऐतिहासिक महत्त्व असलेला तालुक्यातील एकमेव तलावाची दुरुस्ती व संरक्षणाबाबत पाटबंधारे विभागाने दखल घ्यावी.'' - योगेश ईप्पर, माजी सरपंच खिर्डीसाठे.

''पाझर तलाव पूर्ण भरल्याने यंदा बारमाही पिकांचे उत्पादन होईल. माझ्या सत्तर वर्षांच्या काळात चौथ्यादा धरण ओसंडून वाहत आहे.'' - तान्हाजी नागरे, शेतकरी खिर्डीसाठे.

हेही वाचा: Nashik : ‘स्मार्ट’ कामे गेली गोदावरीच्या पुरात वाहून

loading image
go to top