
नाशिक : सातबारावर ‘ताईं’चे नाव असल्यास कृषीच्या योजनांमध्ये राहील प्राधान्य
नाशिक - ‘लक्ष्मी’ योजनेतून साध्या कागदावर अर्ज केल्यावर एक रुपयाही खर्च न करता पंधरा दिवसांमध्ये सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांचे नाव लावले जाईल. उताऱ्यावर पुरुषांची नावे राहतील. पण उताऱ्यावर ‘ताईं''चे नाव असल्यास कृषी विभागाच्या योजनांमध्ये पन्नास टक्के प्राधान्य मिळेल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृहात झालेल्या महाराष्ट्रदिनी (ता. १) महिलांसाठीच्या परिसंवादासाठी श्री. भुसे हे सपत्नीक उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते.
श्री. भुसे यांच्या हस्ते जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी व शेतकरी गटांचा सन्मान करण्यात आला. कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अनिताताई भुसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी संचालक विकास पाटील, कैलास मोते, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी उपस्थित होते. श्री. भुसे म्हणाले, की कृषी क्षेत्रात २० वर्षांपूर्वी महिलांचे नगण्य असणारे प्रमाण वाढताना दिसत आहे. कृषी महाविद्यालयांमध्ये प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. पण केवळ १४ टक्के महिलांच्या नावावर शेती असल्याने बँकेचे कर्ज, विविध शासकीय योजनांच्या लाभापासून त्या वंचित राहतात. कापूस वेचताना महिला शेतमजुरांना हाताला जखमा होऊ नये, यासाठी हातात मोजे व शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली पिशवी देण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत. तसेच कमी वेळेत अधिक व चांगले काम कसे करावे, याबाबतचे महिला शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. पोकरा योजनेमध्ये चार हजार गावांमध्ये कृषिमित्र ऐवजी कृषिताईची नेमणूक केल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
‘आत्मा’तर्फे भूषविण्यात आलेले सन्मानमूर्ती
दिंडोरीच्या पूनम डोखळे, गिरणारेचे नितीन गायकर, पेठचे महेश टोपले, इगतपुरीचे सखाहरी जाधव व जगन्नाथ घोडे, निफाडचे शरद शिंदे व गणेश चव्हाण, चांदवडचे ज्ञानेश्वर गांगुर्डे व बापू साळुंखे, येवल्याचे रामदास ठोंबरे व सागर साळुंके, कळवणचे गणेश पवार व दौलत शिंदे, देवळाचे कैलास देवरे, दिंडोरीचे बाबूराव बोस, मालेगावचे महेंद्र निकम व चंद्रकांत शेवाळे, नांदगावचे दत्तू सोनवणे व सचिन शिलावट, पळसेचा दारणामाई स्वयमसहाय्यता शेतकरी गट, मालेगावचा भूमिपुत्र शेतकरी बचतगट
Web Title: Fifty Percent Priority In Schemes Of Agriculture Female Name On Transcript
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..