
थेट पोलिस स्थानकाबाहेरच महिलांचे 2 गट भिडले; दोन जखमी
नांदगाव (जि. नाशिक) : कौटुंबिक भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) उघडकीस आली. या हाणामारीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस ठाण्याबाहेरच हाणामारी झाल्याने परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. दरम्यान पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत भांडणाची कुरापत काढणाऱ्या संशयितांचा अस्वलदऱ्यात शोध घेतला गेला.
पोलिस स्थानकाबाहेरच धुमश्चक्री
शुक्रवारी सायंकाळी येथील पोलिस स्थानकाबाहेरच महिलांचे दोन गट एकमेकांत भिडले. भांडणाचे कारण सुरुवातीला काही कळाले नाही. दोन गटाच्या भांडणात अचानक कुणीतरी दगड भिरकावल्याने प्रकरण अधिक चिघळून भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. दगडफेकीला सुरुवात झाल्याने पळापळ सुरू झाली. अस्वलदऱ्यातील दोघं गट असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान या हाणामारीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. थेट पोलिस स्थानकाबाहेर सुरू असलेली धुमश्चक्रीपासून अनभिज्ञ असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती कळताच ते बाहेर आले. पोलिसांकडून किरकोळ लाठीमार करण्यात आला. जखमी महिलांना सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. दरम्यान, मिनी लखीम भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नवरा नांदवायला तयार असताना मावस सासू व दीर हे एकत्रित राहू देत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. संशयित मुन्ना भोसले, बाजी भोसले, बाळू भोसले, भावड्या भोसले आदींविरोधात तक्रार दाखल केली असून दुसऱ्या गटाने उशिरापर्यंत तक्रार दाखल केली नव्हती.