Nayak Ganesh Jagtap Death : शाश्रृनयनांनी नायक जगतापांना अखेरचा निरोप | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Father Sampat Jagtap and wife Sheetal taking final darshan of Parthiva.

Nayak Ganesh Jagtap Death : शाश्रृनयनांनी नायक जगतापांना अखेरचा निरोप

नांदूर शिंगोटे (जि. नाशिक) : भारतीय सैन्य दलाच्या दहा मॅकेनाईज बटालियनमधील नायक गणेश संपत जगताप (रा. कणकोरी, ता. सिन्नर) यांना शुक्रवारी (ता. १६) दुपारी संततधारेत शाश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. जगताप आजारी पडल्याने चार दिवसांपासून दिल्ली येथील आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (final farewell to Nayak Ganesh Jagtap by artillery centre jawan Nashik Latest Marathi News)

सलामी देताना आर्टिलरी सेंटरचे जवान.

सलामी देताना आर्टिलरी सेंटरचे जवान.

कणकोरी येथील सामान्य शेतकरी व वारकरी पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबात जन्मलेले गणेश २००७ मध्ये नगर येथे भरती होऊन भारतीय सैन्य दलात सामील झाले होते. सध्या ते पंजाब राज्यातील भटिंडा येथे २३ मेकॅनिक रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. महिनाभरापूर्वी मुलगा श्रीयांश याची डेंगीमुळे तब्येत बिघडल्याने ते रजा घेऊन गावी आले होते.

बाळ ठणठणीत बरा होऊन घरी आल्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर हजर होण्यासाठी ११ सप्टेंबरला रवाना झाले. मात्र, प्रवासातील दगदग, बाळासोबत हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्याने त्यांना काहीसा त्रास होऊ लागला. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दिल्ली येथील आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व उपचारांना दाद न देता ते कोमात गेले.

अखेरच्या क्षणी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. बुधवारी (ता. १४) दुपारी चारच्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. नायक गणेश जगताप यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर कणकोरी गावासह अवघा सिन्नर तालुका शोकमग्न झाला होता. गुरुवारी दिल्ली येथील लष्करी मुख्यालयात सोपस्कार आटोपल्यानंतर गणेश यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास विमानाने शिर्डी येथे पोचले.

तेथून तळेगाव, निमोण, नांदूर शिंगोटेमार्गे लष्करी रुग्णवाहिकेतून पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले. सोबत त्यांच्या रेजिमेंटमधील सहकारी व देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटरचे पथक होते. पार्थिव जगताप यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

तरुणांनी ‘नायक गणेश जगताप अमर रहे’च्या घोषणा दिल्या. सजविलेल्या रथातून पार्थिव संपूर्ण गावातून मिरवण्यात आले. पावसात हजारो लोक उपस्थित होते. माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते.

लष्करी जवान व पोलिसांचा लवाजमा पार्थिव असलेल्या रथासोबत अंत्यविधीस्थळापर्यंत चालत आला. गणेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत रात्रीतून चौथरा बांधला होता. याच ठिकाणी लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकासाधिकारी मधुकर मुरकुटे, वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, युवा नेते उदय सांगळे, सीमंतिनी कोकाटे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. वडील संपत जगताप, आई छाया, भाऊ अनंत, पत्नी शीतल, भावजयी रूपाली, विवाहित बहीण सविता उशीर यांना शोक अनावर झाला होता.

आजाणत्या वयात पित्याचे छत्र हरपलेली चार वर्षांची मुलगी ओवी, सहा महिन्यांचा मुलगा श्रीयांश यांना बघून उपस्थितांचे डोळेही पानावले. नायक गणेश जगताप यांचा अंत्यविधी सुरू असताना, जोरदार पाऊस सुरू होता. लष्कराच्या बँड पथकाकडून राष्ट्रगीताची धून वाजविल्यानंतर आर्टिलरी सेंटरच्या जवानांनी बंदुकांची फैरी झाडून गणेश यांना अखेरची सलामी दिली.