
नाशिक जिल्ह्यातील पहिली ई- पेपरलेस ग्रामपंचायत; पिंपळकोठे
अंबासन (जि. नाशिक) : ग्रामपंचायत कारभार म्हटला की, अनेकजण समज गैरसमज करतात. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, यासाठी ई- पेपरलेस ग्रामपंचायत तयार केली असून, प्रत्येक करदात्याला मोबाईल अॅपद्वारे कराचा भरणादेखील करता येणार आहे. अशाप्रकारे कर भरणा करून घेणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, या उद्देशातून हा उपक्रम हाती घेतल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून बोलले जाते.
पिंपळकोठे (ता. बागलाण) गावाची लोकसंख्या दोन हजार ३३२ आहे. प्रत्येक घरावर ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी क्यूआर कोड लावण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा सर्व व्यवहार पारदर्शकपणे पार पाडला जाणार आहे. त्यातून ग्रामपंचायतीत कुठल्याही कराचा भरणा करण्यासाठी थेट रक्कमही हाताळली जाणार नाही. शिवाय गावकऱ्यांकडून थेट बँकेतच कराचा भरणा होणार असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार देखील पारदर्शक होणार आहे. दरम्यान, करदात्यांना कराची थकीत रक्कम तसेच घराचा उतारा, कराची भरायची रक्कम आदी सुविधा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दिसून येते.
हेही वाचा: Agneepath Yojana : बिहारमधील आंदोलनाने रेल्वेसेवा कोलमडली; अनेक गाड्या रद्द
क्यूआर कोडमुळे होणारे फायदे
गावातील सर्व घरांवर क्यूआर कोड ग्रामपंचायतच्या खातेदारकांचे नाव व घर क्रमांकासह लावल्यास ग्रामपंचायत कर्मचारी नऊ नंबर रजिस्टर न घेता फक्त मोबाईलने स्कॅन करून सदर खातेदारावर किती बाकी आहे हे बघू शकतात. ग्रामपंचायत कर्मचारीचे काम सहज व सोपे होते. घरपट्टी, पाणीपट्टी वसुली अधिक जलद गतीने होण्यास मदत होते. यासाठी ग्रामपंचायतीस अतिशय अल्पदरात क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. ९ नंबर तयार करून अगदी सोप्या पद्धतीने आमच्या पोर्टलला एंट्री करता येते. ९ नंबरच्या एंट्री पूर्ण झाल्यावर सहा दिवसांत क्यूआर कोड ग्रामपंचायतला भेटतील.
''ग्रामीण भागातही डिजिटल क्रांती झाली पाहिजे या उद्देशातून करदात्याकडून ग्रामपंचायतीचा स्वनिधी कसा प्राप्त होईल यासाठी क्यूआर कोड तयार करून यशस्वी होत आहोत.'' - किशोर भामरे, सरपंच, पिंपळकोठे
''आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे क्यूआर कोड तयार करून प्रत्येक घरावर चिटकवला आहे. करदात्याला मोबाईलवर कर भरता येणार आहे. ग्रामपंचायतीचा विकास होण्यासाठी आम्ही ‘ई- पेपरलेस ग्राम’ संकल्पना राबविली आहे. ही संकल्पना जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत आहे.'' - योगेश भामरे, ग्रामसेवक, पिंपळकोठे
हेही वाचा: SSC Result : शेतीकाम करून वैष्णवीने मिळवले यश; वडिलांची केली स्वप्नपूर्ती
''ग्रामपंचायत करवसूली खुप कमी प्रमाणात होत होती. त्यात कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली क्यूआर कोडची संकल्पना आखली यात करदात्याकडूनही प्रतिसाद मिळत आहे.'' - महेश जगताप, संगणक परिचालक, पिंपळकोठे
Web Title: First E Paperless Gram Panchayat In Nashik District News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..