
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’ च्या देयकांसाठी कामांचे व्हीडीओ आवश्यक; मित्तल यांचा कडक पवित्रा
Nashik News : गत दोन आठवडयापासून जिल्हयात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत लोकप्रतिनिधींकडून ताशोरे ओढण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कामांबाबत आता कडक पवित्रा घेतला आहे.
ठेकेदारांना कामांची देयके सादर करताना फोटोसह कामांचे, पाईप तसेच अभियंत्यांनी दिलेली भेट यांचे व्हीडीओ अपलोड करणे बंधनकारक केले आहे. (For Jal jeevan mission payments videos of works are required nashik news)
अभियंत्यांचाही तांत्रिक अहवाल सादर करणे त्यांना आवश्यक केला आहे. यामुळे ठेकेदारांसह शाखा, उपअभियंता यांचे धाबे दणाणले आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये जलजीवन मिशनच्या सुरू असलेल्या कामांबाबत प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी तर, पंचनामा केला होता. त्यावर मित्तल यांनी जलजीवन मिशन अंतर्गत प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा घेतला. त्यात वर्क क्वॉलिटी मॉनिटरींग सिस्टीम वापराबाबत सूचना केल्या. यामध्ये योजनानिहाय तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, परिशिष्ट-ब, कार्यादेश इत्यादी सर्व बाबींची माहिती अद्यावत करुन सर्व आदेशांच्या प्रती पीडीएफ स्वरुपात अपलोड करण्यात याव्यात.
योजनानिहाय अंदाजपत्रक, नकाशे, ठराव व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा उद्भव दाखला इत्यादी सर्व बाबींची माहिती अद्यावत करुन सर्व आदेशांच्या प्रती पीडीएफ स्वरुपात अपलोड करणे आवश्यक आहे. देयके सादर करताना उपांगनिहायचे ३६० डिग्रीमध्ये व्हीडीओ व फोटो अपलोड करण्यात यावेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
व्हीडीओ अपलोड करताना शाखा अभियंता व उपअभियंता यांनी योजनेस प्रत्यक्ष भेटी दिलेलेच व्हीडीओ अपलोड करण्यात यावेत. देयक सादर करतांना पाईपचे फोटो व्हीड़ीओत अपलोड करताना कंपनीचे नाव, व्यास व किती पाईप वापरण्यात येत आहेत ते स्पष्टपणे फोटो व व्हीडीओमध्ये दिसणे आवश्यक आहे.
देयक सादर करताना टाटा कन्सल्टींग इंजिनियरिंग या त्रयस्त तांत्रिक तपासणी संस्थेचे अहवाल अपलोड करणे बंधनकारक राहील. त्यामध्ये उपस्थित मुद्यांची शेरे पूर्तता करणेची जबाबदारी संबंधित शाखा अभियंता व उपअभियंता यांची राहील. देयक सादर करताना मोजमाप पुस्तिका देयक, साहित्य तपासणी अहवाल व आवश्यक सर्व दाखले पीडीएफ स्वरुपात अपलोड करण्यात याव्यात.
पूर्तता झाली तरच मिळणार देयक
मॉनिटरींग सिस्टीममध्ये योजनेंतर्गत प्रथम, दुसरे व तिसरे देयकही अपलोड करण्यात यावेत. देयकाची प्रत विभागीय कार्यालयास सादर करताना देयकाची पीडीएफही सिस्टीममध्ये देखील त्याच दिवशी अपलोड करुन फॉरवर्ड करणे अनिवार्य राहील. योजनेच्या कामांबाबत संबंधित उपअभियंत्यांनी तांत्रिक अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
या सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास देयक पारित होईल अन्यथा देयके पारित न करता परत करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबतचे थेट परिपत्रक काढण्यात आले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहे.