वनहक्क दाव्यांची होणार पडताळणी
जिल्हा प्रशासन : १६ लाखांचा निधी; उपग्रह छायाचित्रांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : वनहक्क दाव्यांची पडताळणी अधिक अचूक, वस्तुनिष्ठ आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. या पडताळणीसाठी १६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यात सन २००५ या कालावधीतील उपग्रह छायाचित्रे सामूहिकरीत्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेत संबंधित जमिनीवरील पूर्वीची स्थिती व उपलब्ध अभिलेखांच्या आधारे दाव्यांची तपासणी करणे महत्त्वाचे असते. काही प्रकरणांत जमिनीच्या वापराबाबत, प्रत्यक्ष क्षेत्राबाबत किंवा संबंधित कालावधीतील परिस्थितीबाबत पडताळणी करण्याची आवश्यकता असते. अशा वेळी उपग्रह छायाचित्रे महत्त्वाचा संदर्भ उपलब्ध करून देऊ शकतात. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या पडताळणीच्या प्रक्रियेसाठी सन २००५ कालावधीतील उपग्रह छायाचित्रे सामूहिकरीत्या उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या छायाचित्रांच्या माध्यमातून संबंधित कालावधीतील जमिनीची स्थिती, वापर आणि भौगोलिक परिस्थिती यांची पडताळणी करण्यास मदत होईल. तसेच, वनहक्क दाव्यांशी संबंधित अपील प्रकरणे व क्षेत्र पडताळणीच्या कामासाठी त्यांचा उपयोग केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
वनहक्क दाव्यांशी संबंधित अपील प्रकरणांमध्ये उपलब्ध कागदपत्रे, महसुली अभिलेख, प्रत्यक्ष क्षेत्राची माहिती आणि इतर संबंधित पुराव्यांचा विचार करावा लागतो. उपग्रह छायाचित्रांच्या मदतीने संबंधित क्षेत्राच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करता येऊ शकतो. त्यामुळे दाव्यांची छाननी करताना संबंधित अधिकाऱ्यांना पूरक माहिती उपलब्ध होईल. तसेच, क्षेत्र पडताळणीशी संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक संदर्भ तपासण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
माहितीच्या आधारे निपटारा
वनहक्क दाव्यांसाठी संबंधित उपग्रह छायाचित्रे एमआरसॅटकडून प्राप्त करून घेण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील संबंधित प्रकरणांसाठी ही छायाचित्रे सामूहिकरीत्या उपलब्धतेनंतर आवश्यक संदर्भ माहिती एकत्रित स्वरूपात मिळण्यास मदत होईल. छायाचित्रे आणि इतर अभिलेखांच्या एकत्रित अभ्यासातून प्रकरणांची वस्तुनिष्ठ तपासणी करण्यास मदत होईल. परिणामी, संबंधित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यास हातभार लागेल, असे जिव्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.