
नाशिक : मनुष्यबळाअभावी चारशे कोटींची थकबाकी
नाशिक : महापालिकेतर्फे वार्षिक करवसुलीची उद्दिष्टपूर्ती साधण्यात प्रशासनाला शंभर टक्के यश आले आहे. असे असले तरी एकूण थकबाकीचा विषय बघता थकबाकीचा आकडा साडेचारशे ते पाचशे कोटीपर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे शहरातील मोठ्या, तसेच शासकीय आस्थापनाही अग्रभागीच आहे. त्यामुळेच भलेही दरवर्षी वार्षिक उद्दिष्टपूर्तीच्या तात्पुरत्या इलाजापेक्षा एकूण थकबाकीचा कायमचा उपाय प्रशासन शोधणार का, हा प्रश्न कायम आहे.
महापालिका कर विभागाला ३६० मनुष्यबळाची गरज आहे. २०१३ मध्ये २७० मनुष्यबळ होते. सध्या ही संख्या जेमतेम ९६ कर्मचारी इतकी कमी झाली आहे. ९ वर्षात ३ लाख १० हजाराहून मिळकतीची संख्या ४ लाख ८० हजारावर गेली आहे. तर पाणीपट्टी वसुलीची संख्या दीड लाखांहून ही संख्या २ लाख १० हजारावर पोचली आहे. कामाचा ताण प्रचंड वाढत चालला आहे. मनुष्यबळात वाढ होत नसल्याने केवळ वार्षिक उद्दिष्टपूर्ती डोळ्यासमोर ठेवूनच कामकाजावर भर दिला जातो आहे. त्यातून आता करवसुली करूनही ती रक्कम तिजोरीत भरायची नाही, असे गैरप्रकारही पुढे येऊ लागले आहे. पूर्वी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीला वेगळे कर्मचारी कार्यरत होते. मात्र, आता या विभागात दोन्ही काम एकाने करण्याची पध्दत सुरू केली. एक कर्मचारी २५०० ते ३५०० मिळकती आणि ५०० ते १ हजाराच्या आसपास नळ कनेक्शनच्या जबाबदाऱ्या आहेत.
हेही वाचा: नाशिक महापालिकेत २२ अधिकारी वाहनाविना
मोठ्या आस्थापनांमुळे आधार
यंदा १३० कोटी प्रॉपर्टी करवसुलीचे उद्दिष्ट होते. या विभागाने १४९ कोटी वसूल केले, तर ४५ कोटी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट असताना ६४ कोटी वसूल केले. वार्षिक वसुलीचा विचार करता प्रशासकीय यंत्रणेच्या दृष्टीने वार्षिक करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीचे समाधान आहे. पण जेव्हा एकूण थकबाकीचा विचार करता ही संख्या साडेचारशे कोटीच्या आसपास पोचली आहे. मात्र यात प्रतिभूती मुद्रणालय १ कोटी १० लाख, मेरी १ कोटी १० लाख, मविप्र शिक्षण संस्था २२ लाख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पाणीपट्टी २२ लाख या मोठ्या आस्थापनाकडील थकबाकीच्या आकडेवारीमुळे महापालिकेच्या वार्षिक उद्दिष्टपूर्तीला आधार मिळाला आहे.
दीर्घ थकबाकी कधी?
प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय आस्थापनाकडे १६ कोटी थकीत आहे. विभागीय महसूल आयुक्तालयापासून, तर अनेक शासकीय संस्थांकडेही मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. सर्वाधिक पंचवटी (५१), नाशिक रोड (४८), सिडको (४०), पूर्व (४१), पश्चिम (२७) तर सातपूर विभागाकडे ३८ टक्के थकबाकी आहे. ही संख्या एकूण वार्षिक उद्दिष्टांच्या सुमारे एक तृतांशाने अधिक आहे. ही कायमची दीर्घकालीन थकबाकी कधी वसूल होईल, हा प्रश्न कायम आहे.
विभागनिहाय करवसुली
विभाग थकीत वसूल टक्के
सातपूर १६ कोटी ८२ लाख ६२
पश्चिम २७ कोटी २५ लाख ७३
पूर्व २७ कोटी ५५ लाख ५९
पंचवटी २३ कोटी ९४ लाख ४९
सिडको २८ कोटी ९३ लाख ६०
ना. रोड २४ कोटी ९७ लाख
हेही वाचा: नगरसेविकेच्या पतीकडे मागितली खंडणी
''सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटीची थकबाकी बाकी असल्याने केवळ वार्षिक उद्दिष्टपूर्तीच्या आकडेवारीवर समाधान मानणे योग्य नाही. अपुऱ्या मनुष्यबळाचा विषय मार्गी लागला पाहिजे. केवळ करपट्टी विभागच नव्हे तर प्रत्येक विभागात साधारण हेच चित्र आहे. फुगा ताणून किती ताणणार तद्वत कमी मनुष्यबळावर किती ताण देणार.'' - सतीष कुलकर्णी, माजी महापौर
Web Title: Four Hundred Crore Arrears Due To Lack Of Manpower In Nashik Municipal Corporation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..