
Nashik Crime News: चौघांना 2 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; शेतजमीन विक्रीस नकार दिल्याच्या कारणावरून भांडणाचे प्रकरण
येवला (जि. नाशिक) : मुरमी येथील शेतजमीन विक्री करण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात शिविगाळ व मारहाण करणाऱ्या चौघांना येवला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व सोळा हजाराचा दंड ठोठावला आहे. (Four sentenced to 2 years hard labour case of dispute over refusal to sell agricultural land Nashik Crime News)
या खटल्यातील फिर्यादी बाळासाहेब सखाराम शिंदे यांना १४ मार्च २०१३ ला अप्पासाहेब प्रभाकर शिंदे, बाबासाहेब प्रभाकर शिंदे, शंकर प्रभाकर शिंदे व विष्णू प्रभाकर शिंदे (सर्व रा. मुरमी, ता. येवला) यांनी संगनमताने मुरमी येथील ग.नं. १२८ ही जमीन आपल्याला विक्री करावी या कारणावरुन फावडे व काठीने मारहाण केली होती.
तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. येवला न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आनंद वैष्णव यांनी कामकाज पाहिले. एकंदरीत सात साक्षीदार तपासण्यात आले.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
यावर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. लिगाडे यांनी एक मार्चला आरोपी अप्पासाहेब प्रभाकर शिंदे, बाबासाहेब प्रभाकर शिंदे, शंकर प्रभाकर शिंदे व विष्णु प्रभाकर शिंदे यांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसाची साधी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त विविध कलमान्वयेही शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. या सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या असून दंडाची एकत्रित रक्कम १६ हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून भरण्याचा निकाल दिला आहे. या प्रकरणात पैरवी अधिकारी प्रवीण वनवे व चंद्रकांत इनामदार तसेच लिपिक संदीप मेढे यांनी काम पाहिले.