कळवण- देसराणे (ता. कळवण) येथील विधवा महिला ललिता सोमनाथ मोरे यांना जादा परताव्याचे आमिष दाखवत त्यांच्या खात्यावरील पंधरा लाख रुपये परस्पर वळती करून घेत फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी अँक्सिस बँकेतील कर्मचारी तुषार गोसावी याच्याविरोधात कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली. देसराने येथील ललिता सोमनाथ मोरे (वय ३५) यांचे पती सोमनाथ विठ्ठल मोरे वीज वितरण कंपनीत नोकरीस होते. त्यांचे फेब्रुवारी २०२१ मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वीज वितरण कंपनीकडून महिलेस १५ लाख रुपये मिळाले होते. ते पैसे त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ठेवले होते. काही दिवसांनी ॲक्सिस बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी व गणेश खैरनार हे दोघे या महिलेची माहिती काढून घरी येऊ लागले. घरी आल्यावर तुषार गोसावी याने महिलेला त्यांच्याकडे आलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करून देतो, असे सांगून ॲक्सिस बँकेत खाते उघडायला लावले.