मित्र असूनही निर्जनस्थळी नेऊन दरोडा
एक लाखाचे सहा लाख करण्याचे आमिष; तिघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.१३ : एक लाखाच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर मित्रासह आठ जणांनी पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्याच्याकडील २ लाख रुपयांच्या रोकडसह एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना वणी ते फोफशी रस्त्यावर घडली. वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
जेकब निक्लस फर्नांडिस (३९, रा. करपेवाडी, कोळसेवाडी, कल्याण पूर्व, जि. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. ते पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात. संशयित विजय आहेर हा जेकबच्या शाळेतील मित्र असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने सांगितलेल्या योजनेला प्रतिसाद दिला. एक लाख रुपयांच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून जेकबला रोख रकमेसह बोलावून घेतले. ९ ऑक्टोबरला दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान जेकब वणी येथे आल्यानंतर संशयितांनी त्यांना वणी ते फोफशी रस्त्यावरील वणीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील निर्जनस्थळी नेले. तेथे चाकूचा धाक दाखवून तसेच हाताने मारहाण करून पांढऱ्या रंगाच्या तवेरात बसविले. वाहनातही त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर जेकबकडील दोन लाख रुपये रोख, सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयफोन १५ प्रो मॅक्स, ३५ हजार रुपये किमतीचा वनप्लस मोबाईल आणि दोन हजार रुपये किमतीची डेल कंपनीची काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग लुटून नेली. विविध बँकांची क्रेडिट व डेबिट कार्डेही आरोपींनी नेली. लुटलेल्या ऐवजापैकी अद्याप कोणतीही वस्तू हस्तगत झालेली नसल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विजय चिंतामण आहेर (३८, रा. वेरूळा फाटा, दळवट, ता. कळवण), प्रदीप यशवंत गावित (३४, रा. नाळीद, पो. देसराणे, ता. कळवण), संदीप रामदास शिंदे (४७, रा. गणेशनगर, कळवण) यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी पाच जणांचा शोध सुरु आहे. दरम्यान संशयितंना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
--------------