esakal | इच्छा असतानाही मृतदेह ताब्यात घेतला नाही; विदारक चित्र!
sakal

बोलून बातमी शोधा

death body

इच्छा असतानाही मृतदेह ताब्यात घेतला नाही; विदारक चित्र!

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : आर्थिक परिस्थिती बिकट व पैशांची जमवाजमव होऊ न शकल्याने ४८ तास उलटूनही इच्छा असतानाही मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांची हिंमत होत नसल्याचा अंगावर शहारे आणणारा दुःखद प्रसंग बघायला मिळाला. त्यामुळे हा कोरोना आणखी काय काय दाखविणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत. काय घडले नेमके?

४८ तास उलटूनही मृतदेह ताब्यात नव्हता घेतला

सिडकोतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सिन्नर येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाइकांना कळविले. मात्र, दोन दिवस उलटूनही नातेवाईक मृतदेह घेण्यास येत नसल्याने अखेर पोलिसांच्या मदतीने नातेवाइकांना बोलावून रुग्णाचा अंत्यविधी केल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णाची तब्येत बिघडत असल्याने बेड उपलब्ध व्हावा, यासाठी अनेक नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे त्रिमूर्ती चौकातील एका हॉस्पिटलमध्ये फोन सुरू होते. गुरुवारी (ता. ८) रात्री साडेअकराच्या सुमारास बेड उपलब्ध झाल्याने उपचारासाठी दाखल केले. या वेळी ऑक्सिजन लेव्हल ३७ इतकी असल्याने ते सिरिअस होते. त्यानंतर उपचार सुरू असताना रविवारी (ता. ११) ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने हॉस्पिटलमधून या रुग्णाच्या नातेवाइकास तुमचे पेशंट खूपच सिरिअस असल्याबाबतचा फोन करण्यात आला. यानंतर रात्री दोन ते अडीचच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णाच्या नातेवाइकास फोन करून तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले.

अखेर पोलिसांच्या मदतीने अंत्यविधी

दोन दिवस उलटले तरीही रुग्णाचे नातेवाईक मृतदेह घेण्यास आले नाहीत. अखेर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांच्या मदतीने रुग्णांच्या नातेवाइकांना बोलावून रुग्णाचा मृतदेह अखेर हॉस्पिटलमधून काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.