Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवासाठी जाहिरातींवर कर आकारणी | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवासाठी जाहिरातींवर कर आकारणी

नाशिक : कोरोना संसर्गापासून काही प्रमाणात मुक्ती मिळाल्यानंतर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी मंडळांनी केली आहे. मात्र, उत्सव साजरा करताना यंदा शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

महापालिकेकडून ऑनलाइन परवानगी घेण्याबरोबरच मंडप धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल. तर, मंडळांकडून होणाऱ्या जाहिरातींवर कर आकारणी केली जाणार आहे. (_Ganeshotsav 2022 Taxation on Advertisements for Ganeshotsav Nashik latest marathi news)

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आले. परंतु, आता कोरोना नियंत्रणात आला असताना उत्सवदेखील मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्याची तयारी सुरू झाली आहे. यंदा श्रीगणेशाचे आगमन लवकर होणार आहे. ३१ ऑगस्टला घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना होईल. तसेच, सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे होतील.

सार्वजनिक ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या उत्सवांसाठी महापालिकेने यापूर्वी जाहीर केलेली शासनमान्य सुधारित नियमावली अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणेश मंडळांना मंडप धोरणाचे काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

मंडपासाठी महापालिकेसह पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या मंडपाला परवानगी दिली जाणार नाही. त्याचबरोबर गरजेच्या ठिकाणी जसे रेल्वेस्थानक, बसस्थानक, रिक्षा स्टॅन्ड, हॉस्पिटल्स व शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी मंडप टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही.

उत्सवासाठी कमान उभारतानादेखील निकष ठरवून देण्यात आले आहे. मंडळांना आता दोनच कमानी उभारता येणार आहे. शैक्षणिक संस्था, रुग्णालय, न्यायालय, धार्मिक ठिकाणे आदी शांतता क्षेत्रात शंभर मीटरपर्यंत मंडप टाकता येणार नाही. त्याचप्रमाणे लाऊडस्पीकरसाठी पोलिस विभागाकडून स्वतंत्र परवानगी घेणे गरजेचे राहणार आहे. लेखी परवानगी मिळाल्यानंतरच मंडप टाकता येणार आहे.

वीज वितरण कंपनीने परवानगी दिली, तरच मंडपाच्या ठिकाणी वीजपुरवठा घेता येईल. मंडपाच्या ठिकाणी २०० लिटर क्षमतेच्या दोन पाच टाक्या व वाळूच्या दोन बादल्या भरून ठेवाव्या लागणार आहे. अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मंडळांना घ्यावे लागेल.

धार्मिक भावना दुखावता येईल, असे देखावे करता येणार नाही. चुकीच्या पद्धतीने मंडप टाकण्याबरोबरच उत्सव साजरा करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल, असे महापालिकेच्या परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: Dhule : अजंग शिवारात बायोडिझेल टॅंकर पकडला

असे आहेत नियम

- http://nmcfest.nmc.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची सोय.

- मंडपापासून 15 मीटरपर्यंतच विद्युत रोषणाई.

- वाणिज्य स्वरूपाच्या जाहिरातींना कर.

- नोंदणीकृत कंत्राटदारांकडून विद्युत विषयक कामे.

- मंडप टाकण्यासाठी रस्ता खोदण्यास मनाई.

- रस्ता खोदल्यास दंडात्मक कारवाई.

परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे

- मंडप स्थळ दर्शक नकाशा.

- पोलिस विभागाचा ना हरकत दाखला.

- वाहतूक शाखेचा ना हरकत दाखला.

- अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला.

नागरिकांना तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

- तक्रार निवारण केंद्र (१८००२३३१९८२)

- पूर्व विभाग (०२५३- २५०४२३३)

- पश्चिम विभाग (०२५३-२५७०४९३)

- पंचवटी (०२५३- २५१३४९०)

- सिडको (०२५३- २३९२०१०)

- सातपूर (०२५३-२३५०३६७)

- नाशिक रोड (०२५३-२४६०२३४)

- ई-मेल आयडी- Nmc@nmc.gov.in

हेही वाचा: काझी गढीचा भाग कोसळला; 4 जणांची सुखरूप सुटका