
गॅस दरवाढ : नाशिकच्या ग्राहकांना महिन्याला 92 लाखांचा भुर्दंड
नाशिक : पावसाला सुरवात झाली, तसा घरगुती गॅसचा वापर वाढला आहे. एवढेच नव्हे, तर यापुढील आठ महिने ही स्थिती कायम राहणार आहे. अशा काळात घरगुती गॅस सिलेंडरमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यातील ग्राहकांवर ९२ लाख ५० हजार रुपयांचा भुर्दंड महिन्याला बसणार आहे. (Gas cylinder price hike latest news)
घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांकडे १८ लाख ५० हजार ग्राहकांची नोंदणी झाली आहे. त्यातील मार्च ते जून या कालावधीत सर्वसाधारपणे ८० टक्के ग्राहक महिन्याला सिलेंडर विकत घेतात. त्यामुळे कंपन्यांकडे ‘रिफिलींग' करुन घेणाऱ्या ग्राहकांची संख्या १० लाख ५० हजाराच्या आसपास आहे. वितरकांकडे आता मात्र शंभर टक्के ग्राहकांनी सिलेंडरसाठी मागणी करण्यास सुरवात केली आहे. अन्न शिजवण्यासाठी अधिकचा लागणारा वेळ आणि कोरोनापासून भोजन करताना अन्न पदार्थ गरम करण्याची लागलेली सवय व एरव्ही थंड पाण्याने स्नान करणारे आता स्नानासाठी गरम पाण्याचा वापर करु लागले आहेत. ही कारणे घरगुती गॅसच्या वाढलेल्या वापरामागील आहेत. एकीकडे गॅसचा वापर वाढला असताना आगामी आठ महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या शंभर टक्के सिलेंडरच्या ‘रिफिलींग'च्या पार्श्वभूमीवर सिलेंडर महागले आहे. अगोदर महागाईच्या झळांनी कुटुंबाच्या खर्चाची जुळवाजुळव करणे नाकीनऊ आलेले असताना सिलेंडरच्या अतिरेक खर्चामुळे अनेक कुटुंबांना जिकीरीचे झाले आहे.
हेही वाचा: सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस दिल्ली दरबारी; अमित शहांची प्रथमच घेतली उघड भेट
सिलेंडरच्या भाववाढीच्या विरोधात आंदोलनाची ठिणगी पडली आहे. महिलांनी महागाईविरोधात नाराजीचा सूर आळवण्यास सुरवात केली आहे. सिलेंडरच्या भाववाढीची ही स्थिती कायम राहिल्यास सिलेंडर वापराकडील कल कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे, तर ग्रामीण आणि आदिवासी भागात इंधनासाठी लाकडाचा सुरु झालेला शोध अधिक वाढण्याची स्थिती सध्या तयार झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आगामी निवडणुकांमध्ये त्याचा झळा कोणत्या राजकीय पक्षाला बसणार याचे उत्तर मतदानातून मिळण्यास मदत होईल.
काय म्हणताहेत गृहिणी
''महागाईमुळे एवढे त्रस्त झालोत, त्यात सिंलेडरची भाव वाढ झाली. त्यामुळे सामान्य लोकांनी कसं जगायच? खायचं अन्न शिजवण्यासाठी वापरात येणारा गॅस न परवडणारा होत असेल, तर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे. आर्थिक नियोजनाची सांगड जमेनाशी झाली आहे.'' - उमा पोफळे
''आता कुठं आपण सर्वजण कोरोना महामारीतून कसे तरी सावरतोय. त्यात महागाई खूप वाढलीय. आता त्यात भर म्हणून घरगुती गॅस जी प्रत्येक सामान्य माणसाच्या घरातली गरज आहे आणि इतकी दरवाढ सातत्याने होत आहे, अशा महागाईत सामान्य माणसाने जगायचं तरी कसं?'' - कामिनी देवरे
हेही वाचा: महावितरणचा नागरिकांना शॉक, वीज बील वाढणार
''महागाई झपाट्याने वाढत आहे, परंतु सिलेंडर किंमत खूप वाढली. त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. आता सिलेंडरसाठी सबसिडी सुद्धा मिळत नाही. निदान सबसिडी तरी द्यायला हवी, नाहीतर सिलेंडरची किंमत कमी झाली पाहिजे.'' - चंद्रकला दिघे
Web Title: Gas Cylinder Price Hike Nashik Customers Pay Extra 92 Lakh Per Month Latest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..