(बातमी आवश्यक)
NSK26H33468 : श्रीधर फडके
शहरात आज घुमणार
गीत रामायणाचे सूर
जळगाव, ता. २४ : गेली ७५ वर्षे मनामनावर अधिराज्य गाजवणारा ‘गीत रामायण’ हा संगीतमय कार्यक्रम रविवारी (ता. २५) सायंकाळी सातला शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्य संकुल येथे होणार आहे. डोपामीन क्रिएशन्स संस्थेतर्फे हा कार्यक्रम सादर होत आहे.
पुणे आकाशवाणीच्या निमित्ताने या कार्यक्रमाची बीजे रुजली. ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरांनी आणि संगीताने सजलेला हा कार्यक्रम म्हणजे गीत रामायण. आता हा कार्यक्रम श्रीधर फडके यांच्या सुरमधुर आवाजात होतो. वडिलांचा महान सांगीतिक वारसा समर्थपणे पुढे चालवत त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र व वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमात श्रीधर फडके (सादरकर्ते), तुषार आंग्रे (तबला), सुकन्या जोशी (निवेदिका), निकिता दांडेकर, मेधा चिडगुपकर, महेश देशपांडे (कोरस), आर्य पुरणकर, अतुल माळी (सिंथेसाइझर), चेतन परब (साइड रिदम) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी आस्वाद घ्यावा. अशी विनंती डोपामीन क्रिएशन्सने केली आहे. तिकिटालय या संकेतस्थळावर या कार्यक्रमाची तिकिटे उपलब्ध आहेत.