
Dada Bhuse: जनतारुपी देवाच्या सेवेची अखेरपर्यंत संधी मिळो! मंत्री दादा भुसे
मालेगाव : मी मंत्री असलो तरी आजही सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे, म्हणून मी सोशल मीडियावर हाय, हॅलो अन् लाईक मोजत बसण्यापेक्षा मी जनतेशी थेट संवादावर भर देतो. त्यांची सुख-दुःखे समजून घेतो. जनतेच्या दारात जात मी त्यांना कठीणप्रसंगी धीर देतो.
राजकारण कमी, पण आजही माझा समाजकारणावर भर आहे. त्यामुळे जनताजनार्दनाचा आशीर्वाद आहे म्हणून मी आहे. कोणताही बडेजाव न करता काम करीत राहणे मला आवडते. कदाचित, तेच माझ्यामागे असलेल्या असंख्य जनतेच्या प्रेमाचे द्योतक आहे.
त्यामुळे वाढदिवस येणार अन् जाणार, जनतारुपी देव मला अखेरपर्यंत त्यांची सेवा करण्याची संधी देवो’, असे भावपूर्ण मनोगत आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
श्री. भुसे यांचा आज (ता. ६) वाढदिवस आहे. काँग्रेसचा पराभव करीत मालेगावात प्रथम अपक्ष म्हणून निवडून येत ‘जायंट किलर’ ठरलेल्या दादा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या त्यांच्याकडे मंत्रिपदाबरोबरच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची महत्त्वाची धुराही आहे. त्यांच्या आजवरच्या संघर्षमय प्रवासाबाबत बोलायचे झाले, तर एक चित्रपट निघेल इतका सस्पेन्स, थरार आणि जिद्द आहे. त्यांच्या वाटचालीविषयी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधत विविध मुद्द्यांना स्पर्श केला आणि दादांनीही त्याला तितक्याच दिलखुलासपणे उत्तेर दिली.
* आपल्या आजवरच्या प्रवासाविषयी काय सांगाल?
- माझा संघर्षमय प्रवास सर्वच जाणून आहेत. पण जिल्हा विकासात आघाडीवर असावा, जिल्ह्याचा विकास साधताना मालेगाव व परिसराचाही विकास व्हावा, हीच प्रामाणिक इच्छा आहे. गेल्या सतरा वर्षांच्या कार्यकाळात औद्योगिक वसाहतीसाठी शेती महामंडळाची ८६३ एकर जमिनी मिळवून दिली.
एक मोठा प्रकल्प सुरू होण्याच्या बेतात असून, २५ प्रकल्पांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. शेती महामंडळाच्या २६३ एकर जागेवर कृषी विज्ञान संकुल साकारात आहे. येथे पाच विद्यालयांसह कृषी क्षेत्रातील संशोधनाची कामे होतील. शहरासाठी दोन वेगवेगळ्या टप्प्यात भुयारी गटार योजनेसाठी सुमारे सहाशे कोटी रुपये मंजूर करून घेतले.
ही योजना येथील आरोग्याच्या समस्या व दुर्गंधी संपुष्टात आणण्यास हातभार लावणार आहे. सातत्याने टंचाईच्या झळा सोसणाऱ्या झोडगेसह ५१ गावांतील नळपाणी पुरवठा योजनांचे काम जलजीवन अंतर्गत मार्गी लावले आहे. शहरातील रस्ते विकासासाठी गेल्या पाच वर्षांतच तीनशे कोटींहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे.
विकासकामांबद्दल समाधानी आहात का?
- मुळातच विकासात मालेगाव तालुका पिछाडीवर होता. मला कोणावर टीका करावयाची नाही. मात्र साधा एक कोल्हापूर बंधारा दशकात होऊ शकला नाही. आपण गिरणा-मोसम नदीवर प्रत्येकी पाच कोल्हापूर बंधारे बांधण्यासाठी निधी मिळविला. नदीकाठावरील गावे बारामाही बागायती झाले आहेत.
पाणीपुरवठा योजनांचा पाणीप्रश्न मिटला. नव्याने शहराला जोडणाऱ्या पुलांची निर्मिती झाली आहे. तालुका क्रीडासंकुलाचा सुमारे पाऊण कोटी खर्चातून कायापालट झाला आहे. एक कोटी रुपये खर्चातून एकात्मता जॉगिंग ट्रॅक आकाराला आला आहे.
मोसम नदीवरील नव्या पुलांची निर्मिती, गिरणा नदीवर पुरातन पुलाची दुरुस्ती, १६ कोटी रुपयांचा नवीन पूल, तालुक्यात दहापेक्षा अधिक वीज उपकेंद्र, मुख्य गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरण, सटाणा-मालेगाव रस्त्याचे रुंदीकरण, शहर पाणीपुरवठ्याचा तळवाडे साठवण तलाव, १०० एकर जमिनीत क्षमतावाढ, ई-लर्निंग व डिजिटल शाळा, सामूहिक विवाहातून कन्यादान योजनेचा लाभ, हद्दवाढीतील गावांसाठी विशेष पॅकेजमधून पथदीप, पाणी, रस्ते झाले.
जुने सोयगाव व नववसाहतीतील रस्त्यांची व सांडपाण्याची समस्या जवळजवळ संपुष्टात आली आहे. रमजानपुरा व पवारवाडी पोलिस ठाण्यांची निर्मिती आदी अनेक सांगता येतील, पण कामांच्या बाबतीत समाधान झाले, असे म्हणता येणार नाही. अजून खूप काही करायचे आहे.
* शहराचा चेहरामोहरा बदलताना कामांच्या दर्जाचे काय?
- मालेगाव व परिसर विकासाच्या दृष्टीने कात टाकत आहे. कामांबाबत टीका-टिप्पणी होत असते. चांगल्या कामांनाही आडकाठी येते. मात्र प्रत्यक्षात काम करताना व निधी मिळविताना प्रकल्प सादर केल्यापासून ते योजना मंजुरीपर्यंत सर्व स्थिती आपण जनतेला सातत्याने सांगत असतो. निकृष्ट काम आढळल्यास तक्रार करा.
काम दर्जेदार हवे, असे मी सातत्याने बजावत आलो आहे. एखाददुसऱ्या कामात असे होऊ शकते. यंत्रणा कारवाई करतात. मात्र कामे दर्जेदार व चांगली होतील, याकडे कटाक्ष असतो. प्रमुख कामांवर तर आपले जातीने लक्ष असते. जास्तीत जास्त नागरिकांच्या अडीअडचणी सोडविणे, प्रत्येक गावात समन्यायी पद्धतीने विकासकामे करणे यावर आपला भर आहे.
* माहितीची क्रांती व सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही त्यापासून दूर कसे?
- जनताजनार्दन हेच माझे संदेश वाहक आहेत. माझा संपूर्ण इतिहास, केलेली कामे सर्वांसमक्ष आहेत. आपण रोज सोशल मीडियावर जितके संदेश पाठवितात, तेवढ्या जनसामान्यांना मी दैनंदिन कामानिमित्त रोज भेट असतो. प्रत्येकाशी संवाद होत असतो. यामुळे व्हॉट्सॲप व सोशल मीडियावर फारसा व्यस्त राहात नाही.
कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कामे, सभा, समारंभ, बैठकीचे निरोप कार्यकर्त्यांना व मतदारांना पोचवितात. फक्त हाय, हॅलो करण्यापेक्षा प्रत्यक्ष संवादावर माझा भर असतो. पालकमंत्रिपदाची जबाबदारी असतानाही तालुक्याकडे कुठलेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. वेळ मिळेल तेव्हा, प्रसंगी वेळ काढून जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होतो. येथील दौऱ्यात प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून त्या सोडवितो.
हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
* पक्षातील दुही नवीन सरकारबद्दल?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची गतिमान विकासाकडे वाटचाल सुरू आहे. निर्णयांसाठी प्रतीक्षा पसंत नाही. सरकार नवीन राहिले नाही, हे जनसामान्यांचे सरकार आहे. शासनाने केलेली कामे जनसामान्यांच्या मनात घर करून राहिलेली आहेत. वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र याची परिणिती या कालावधीत सर्वसामान्यांना आली आहे.