Girish Mahajan | भाजपमध्ये प्रवेशासाठी अनिल देशमुखांचा आग्रह : गिरीश महाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Girish Mahajan

Girish Mahajan | भाजपमध्ये प्रवेशासाठी अनिल देशमुखांचा आग्रह : गिरीश महाजन

नाशिक : भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी विधानसभा निवडणुकांपूर्वी अनिल देशमुख यांनी विनवण्या केल्‍या होत्‍या, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता.१३) केला. त्‍यावेळी त्‍यांना तिकीट दिले नाही.

सुदैवाने ते निवडून आले, व गृहमंत्रिपदही मिळाले. परंतु सरकारमध्ये असताना हप्ते बांधल्‍याने त्‍यांना जेलवारी करावी लागली. आता जामिनावर बाहेर आलेले असून, त्‍यांनी आपली कायदेशीर लढाई लढावी, असा सल्‍ला श्री.महाजन यांनी दिला. (Girish Mahajan statement on Anil Deshmukhs request to join BJP nashik news)

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या दीक्षांत समारंभानंतर माध्यमांशी संवाद साधताना श्री. महाजन यांनी टीका केली. निवडणुका घेण्याचे आव्‍हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून, यावर मत विचारले असता ते म्‍हणाले, की निवडणुकांना आता वर्षभर राहिला आहे.

तुम्‍ही सत्तेतून पायउतार झाले म्‍हणजे लगेच निवडणूक घ्यायच्‍या असे नसते. घोडामैदान दूर नसून, निवडणुकांमध्ये बघूया, असे प्रतिआव्‍हान श्री.महाजन यांनी दिले.

पहाटेच्‍या शपथविधीला उपस्‍थित अजित पवारांनी बोलू नये

आगामी निवडणुकांमध्ये बंडखोरांचा मोठा पराभव होणार असल्‍याच्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्‍या वक्‍तव्‍याबाबत श्री. महाजन म्‍हणाले, की अजित पवार यांनी याबाबत चिंता करू नये.

कारण पहाटे झालेल्‍या शपथविधीत ते आमच्‍यासोबत होते. त्‍यामुळे बंडखोरीबाबत बोलण्याचा त्‍यांना अधिकार आहे का, याचा विचार त्‍यांनी करावा. आमच्‍यासोबत आलेले सर्व लोकप्रतिनिधी पुन्‍हा निवडणूक येतील, असा दावा श्री.महाजन यांनी केला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सीआयडी सत्‍य समोर आणेल

ॲड. प्रवीण चव्‍हाणांच्‍या मुद्यावर ते म्‍हणाले, की पेन ड्राईव्‍हची माहिती समोर आल्‍यानंतर चौकशी सुरु झालेली आहे. सीआयडीला आवश्‍यकता वाटली त्यामुळे त्‍यांनी समूळ चौकशी सुरु केलेली आहे.

याअंतर्गत काही लोकांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. झाडाझडती करताना सोक्षमोक्ष लावला जाईल. या प्रकरणात लवकरच सत्‍य समोर येईल, असा दावा श्री.महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

कटप्रॅक्‍टिसवर कायद्यासाठी प्रयत्‍न

वैद्यकीय क्षेत्राला कटप्रॅक्‍टिसची कीड लागली असून, थेट मुंबईपर्यंत लाईन ठरलेली आहे. याविरोधात कायदा करण्याचे आमचे प्रयत्‍न होते. परंतु राज्‍यात मध्यंतरी सत्तांतर झाले. आता पुन्‍हा आमचे सरकार आले असून, कटप्रॅक्‍टिसच्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा करण्यासाठी प्रयत्‍न केले जातील, असे श्री. महाजन म्‍हणाले.