
Nashik: 'त्या' मृतदेहांचा संशयितांच्या घरामोर अंत्यविधी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे दाखल, ग्रामस्थ संतप्त
अस्वली स्टेशन, सर्वतीर्थ टाकेद- सिन्नर: एकतर्फी प्रेमातून भरवीर खुर्द येथील मुलीला तिच्या आई-वडिलांदेखत तिला पळवून नेल्याने हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना नुकतीच घडली.
संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुलीला पळवून नेणाऱ्याच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये दांपत्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी पोलिसांनी तीस ते चाळीस ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, संबंधिताला अटक होईपर्यंत गावाने दुखवटा पाळणार असल्याचे जाहीर केल्याने पोलिसांकडून याप्रकरणी तत्काळ कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या दांपत्याने रविवारी (ता. २८) सायंकाळी देवळाली कॅम्प स्थानकाजवळ आत्महत्या केली होती. उत्तरिय तपासणीनंतर सोमवारी सकाळी दोन्ही मृतदेह भरवीर येथे ताब्यात देण्यात आले, मात्र संतप्त नातेवाईक, ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेहांवर मुलाच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांची मोठी कुमक असतानाही संतप्त नातेवाइकांनी मुलाच्या घरासमोरच अंत्यविधी केल्याने घोटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयित दिगंबर शेळके यांच्यासह ३० ते ४० जणांचा त्यात समावेश आहे. त्यांनी गैरकायद्याने दोन्ही मृतदेह समाधान झनकर यांच्या घराच्या पोर्चमध्ये अंत्यविधीसाठी नेत मृतदेहांची अहवेलना केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. स्मशानभूमीत अंत्यविधी न करता संबंधित व्यक्तीच्या घरी तो केल्याने गुन्हा दाखल आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती एस. व्ही. गंधास तपास करत आहे.पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी बोलताना ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ज्याच्यामुळे हे सारे घडले, तो अजूनही मोकाट फिरत आहे. पोलिसांना तो दिसत नाही का? घटनेला चार दिवस होऊनही अजून त्याला अटक झालेली नाही.
घडलेल्या दोन्ही घटना चुकीच्या असल्या तरी घरासमोर अंत्यसंस्कार हा ग्रामस्थांच्या भावनांचा सामूहिक उद्रेक होता. अंत्यसंस्कारावेळी पोलिस तेथे हजर होते, विशेष फोर्सही होता, मग तेव्हाच ग्रामस्थांना शांत का केले नाही, त्यांची समजूत न काढता किंवा संशयिताला तत्काळ अटक करण्याचे आश्वासन न देता पोलिस निमूटपणे अंत्यसंस्कार होत असताना बघत कसे राहिले, आता आमच्यावर गुन्हा दाखल करून काय साधणार आहेत.
, खरेतर पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांच्यावरच गुन्हा दाखल व्हायला हवा असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल केले तरी संबंधिताला अटक होईपर्यत संपूर्ण गाव दुखवटा पाळणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.