लोगो : जागतिक अंडी दिन विशेष
खाद्य महागले, पाणीही विकत घ्यावे लागणार; पोल्ट्री व्यवसाय संकटात
मक्याचा दर ३० वरून ३५ रुपये किलो; अंड्याच्या उत्पादन खर्चावर थेट परिणाम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : ‘ऑक्टोबर हीट’मुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण, पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ आणि भविष्यातील पाणीटंचाई यामुळे पोल्ट्री व्यवसायासमोर तिहेरी संकट उभे राहिले आहे. पशुखाद्याच्या दरात सध्या ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, आगामी काळात पाणीदेखील विकत घेऊन व्यवसाय टिकवावा लागण्याची शक्यता असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
दर वर्षी ९ ऑक्टोबर हा जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जातो. नाशिक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडे ८६ पोल्ट्रीफार्मची नोंद आहे. याशिवाय गावठी अंडी उत्पादक तसेच हायब्रिड कुक्कुटपालन करणारे छोटे-मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येने या व्यवसायात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अंड्यांना गुजरात आणि मुंबईसह पुणे, येवला, मालेगाव, सुरत, वापी आणि अहमदाबादपर्यंत मागणी आहे.
यंदा उष्णतेच्या वाढत्या परिणामामुळे पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ३० रुपये किलो दराने मिळणारे मका खाद्य सध्या ३५ रुपयांवर पोहोचले आहे. कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या ‘सोया डीआरडी’च्या दरातही सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पशुखाद्य महागल्याने अंडी उत्पादनाचा खर्च वाढला असून, त्याचा थेट परिणाम अंड्यांच्या दरावर होत आहे.
‘ऑक्टोबर हीट’मुळे पोल्ट्रीतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी व्यावसायिकांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. पोल्ट्री शेडवर गवत, उसाचे पाचट टाकून आच्छादन तयार केले जात आहे. पाण्याचा फवारा, हवा खेळती ठेवणे यांसारख्या उपाययोजनांवरही अतिरिक्त खर्च होत आहे. तापमान नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्यास पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
सध्या होलसेल बाजारात एका अंड्याचा दर सुमारे पाच रुपये २० पैसे आहे, तर किरकोळ बाजारात ते सहा ते सहा रुपये ५० पैशांना विकले जाते. मात्र, ‘ऑक्टोबर हीट’मुळे अंड्यांच्या मागणीत अद्याप अपेक्षित वाढ झालेली नाही. आगामी काळात मागणी वाढल्यास अंड्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.
दुष्काळी तालुक्यांची आघाडी
पोल्ट्री व्यवसायात मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांनी आघाडी घेतली आहे. विशेषतः पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या तालुक्यांमध्ये व्यावसायिकांनी अंडी उत्पादनाचे क्लस्टर उभे केले आहे. सिन्नर, मालेगाव आणि चांदवड तालुक्यामध्ये या क्लस्टरची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अंडी उत्पादनात जिल्ह्याचे स्थान भक्कम होत आहे.
गावच्या अर्थकारणाला चालना
लेयर कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे. या व्यवसायातून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारली आहे. अनेक कुक्कुटपालक झोपडीतून बंगल्यात आले, मुलांना उच्च शिक्षण देणे शक्य झाले, तर काहींनी शेतीचा विकास साधला. नव्या पिढीलाही या व्यवसायाची प्रेरणा मिळत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने व्यवसायाचे स्वरूपही बदलले आहे.
कोट
कच्च्या मालाचे दर आताच वाढले आहेत. त्यामुळे भविष्यात अधिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने अंड्यांच्या किमतीवर त्याचा थेट परिणाम होईल. त्यातच पाणीदेखील विकत घ्यावे लागण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे पक्षी जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
-रावसाहेब ढमाले, दुसंगवाडी (ता. सिन्नर)
कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे. पाणी उपलब्ध करून दिल्यास ते विकत घेण्याची वेळ येणार नाही. त्यातून पोल्ट्री व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू ठेवणे शक्य होईल.
-अंकुश वाघ, कहांडळवाडी (ता. सिन्नर)