esakal | नाशिकमध्ये गंभीर प्रकार! मृत कोरोना महिलेचे हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला
sakal

बोलून बातमी शोधा

mangalsutra

नाशिकमध्ये गंभीर प्रकार! मृत कोरोना महिलेचे हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचा आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, हॉस्पिटल प्रशासनाने तपासकामात सहकार्य करण्याचे स्पष्ट केले. काय घडले नेमके?

तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला

याबाबत गौरव शिंदे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या आई कल्याण शिंदे यांची कोरोनामुळे तब्येत खालावली. त्यांना कुटुंबीयांनी राजीव गांधी भवन परिसरातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना, त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र, शिंदे यांच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे उघडकीस आले. ही बाब गौरव शिंदे यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. हॉस्पिटल प्रशासनाने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यातून चोरी गेलेली पोत सापडत नसल्याने गौरव शिंदे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

दोषी सुटणार नाही

याबाबत हॉस्पिटलचे संचालक राजेश यादव यांनी सांगितले, की चोरीची घटना घडली असेल तर ती दुर्दैवी आहे. मात्र, त्यातील दोषी सुटणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. पोलिसांना सर्व सहकार्य आहे. कोरोना उपचार सुरू असलेल्या विभागात आमचे आठ ते दहा कर्मचारी कार्यरत असतात. तर, कधीतरी रुग्णाला भरती करताना काही नातेवाईकही येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.