Nashik Crime News : सोनसाखळी चोर पोलिसांवर वरचढ!; वृद्ध महिला टार्गेट

chain snatching News
chain snatching Newsesakal

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध पोलिस निष्क्रिय ठरल्याचे वारंवार समोर येत असतानाच, ही संधी साधून सोनसाखळी चोरही मरगळलेल्या शहर पोलिसांवर भारी ठरत आहेत. गेल्या १३ दिवसांमध्ये शहर परिसरात ८ जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

यात ६ गुन्ह्यांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या सौभाग्याच्या लेण्यावरच डल्ला मारत तब्बल ५ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्रे खेचून नेली आहेत. विशेषतः पादचारी ज्येष्ठ महिलांना टार्गेट केले जात असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तर दुसरीकडे, निर्ढावलेली पोलिस यंत्रणा गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीही करीत नसल्याने नाशिककरांमध्ये नाराजीचा सूर आहे. (Gold Chain thieves Targets older women Nashik Latest Crime News)

ऐन सणासुदीत शहरात जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बुधवारी (ता.१२) दोन घटना घडल्यामुळे नाशिककरांमध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये नाशिक शहरात जबरी चोरीच्या ८ गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असून, यातील सहा गुन्हे हे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी खेचून नेल्याचे आहेत.

गेल्या महिन्यात महिन्यात, तर आडगाव हद्दीमध्ये स्कूटीवर आलेल्या बंटी-बबलीने महिलेची सोन्याची पोत खेचून नेल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सोनसाखळी चोरीमध्ये आता महिलांचाही सहभाग उघड झाला आहे. या घटनेला तीन आठवड्यांपेक्षा अधिकचा काळ जाऊनही पोलिसांना संशयित बंटी-बबलीचा जेरबंद करण्यात अपयश आले आहे.

साबण घेण्याच्या बहाण्याने खेचली पोत

हनुमानवाडीतील किराणा दुकानात साबण घेण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयिताने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची पोत खेचून नेली. आशा उमेश कराड (६५, रा. पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे महालक्ष्मी किराणा नावाचे दुकान आहे. बुधवारी (ता. १२) सकाळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे जण दुकानासमोर आले. एकाने दुचाकीवरून उतरून दुकानात आला आणि साबण मागितला. आशा कराड यांनी साबण घेऊन कांऊटरजवळ आले असता संशयिताने संधी साधून त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून दुचाकीवरून पोबारा केला.

chain snatching News
Nashik Crime News : कार चालकाकडून बसचालकावर हल्ला; चालक, वाहक जखमी

इंदिरानगरला वृद्धेची पोत खेचली

भाजीपाला खरेदी करून घराकडे पायी जाणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेची ६० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी खेचली. याप्रकरणी सुमन दत्तात्रेय चव्हाण (७०, रा. रथचक्र चौक, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १२) भाजीपाला घेऊन घराकडे परतत होत्या. वनसंपदा सोसायटीजवळ असताना समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे आले. यातील एकाने त्यांना आवाज देऊन थांबविले आणि दुचाकी चालविणाऱ्या भामट्याने चव्हाण यांच्या गळ्यातील ६० हजार रुपयांची ३२ ग्रॅमची सोन्याची पोत खेचून पोबारा केला.

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या १३ दिवसात ६ पैकी ५ गुन्ह्यांमध्ये सोनसाखळी चोरट्यांकडून वृद्ध महिलांना टार्गेट करण्यात आले आहे. भाजीपाला, देवदर्शनासाठी वा वॉक करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या पादचारी वृद्ध महिलांना हेरून सोनसाखळी चोरट्यांकडून चैनस्नॅचिंग केली जात आहे.

यंत्रणा कुचकामी

वाढत्या जबरी चोरीच्या घटनांसाठी शहर पोलिसांची कुचकामी यंत्रणा कारणीभूत ठरत आहे. पोलिस ठाण्यांची गस्तीपथक, बीट मार्शल्स रस्त्यावर फिरताना दिसत नाहीत. पूर्वी असलेले क्युआर कोड स्कॅनिंगचा पोलिसांचा प्रकार बंद झालेला आहे.

नाकाबंदी गुन्हा घडल्यानंतर केली जाते. तोपर्यंत चोर पसार होण्यात यशस्वी होतो. पोलिसांकडून गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले जातात. गेल्या काही महिन्यातील गुन्ह्याची उकल करण्यात
पोलिसांना यश आलेले नाही. यामागे पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने त्यावर सोनसाखळी चोर वरचढ ठरत आहेत.

chain snatching News
Nashik : पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात बनावट दाखला; ठराविक ठेकेदारांवर मेहेरबानी

१३ दिवसांतील जबरी चोरीच्या घटना :

घटनेची तारीख.... हद्द/पोलिस ठाणे .... गेलेला ऐवज
३० सप्टेंबर : कोणार्कनगर, आडगाव : १५५०० सोन्याची पोत
३ ऑक्टोबर : गांधीनगर, उपनगर : १८०००० सोन्याची पोत
१० ऑक्टोबर : बळी मंदिर, पंचवटी : २५००० सोन्याची पोत
११ ऑक्टोबर : बोराडे मळा, म्हसरुळ : २०००० सोन्याची पोत
१२ ऑक्टोबर : हनुमान वाडी, पंचवटी : ९०००० सोन्याची पोत
१२ ऑक्टोबर : इंदिरानगर : ६०००० सोन्याची पोत
११ ऑक्टोबर : अशोका मार्ग, मुंबई नाका : १२००० मोबाईल
११ ऑक्टोबर : महाले फार्म, अंबड : १०५०० मोबाईल

"जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान नाकाबंदी सुरू आहे. सोनसाखळी चोरीमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस तपास सुरू असून, लवकर संशयितही जेरबंद होतील."

- जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त, नाशिक

chain snatching News
Nashik Crime News : तलावडी भागातील अनधिकृत गॅस भरणा केंद्र उद्‌ध्वस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com