Latest Crime News | तलावडी भागातील अनधिकृत गॅस भरणा केंद्र उद्‌ध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Domestic gas cylinder tanks seized from unauthorized gas filling stations.

Nashik Crime News : तलावडी भागातील अनधिकृत गॅस भरणा केंद्र उद्‌ध्वस्त

जुने नाशिक : तलावडी येथील खासगी वाहनांमध्ये अनधिकृतरीत्या गॅस भरणा करणारा केंद्रावर भद्रकाली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून दोन रिक्षांसह ३० घरगुती वापराचे गॅस सिलिंडर असा सुमारे १ लाख ९१ हजारांचा ऐवज जप्त केला. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकास कारवाईच्या सूचना केल्या. तत्पूर्वी त्यांनी धान्य वितरण कार्यालयास माहिती दिली. पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड कर्मचाऱ्यांसह भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाले. (Unauthorized gas filling station in Talavadi area destroyed Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik : आयुक्तांकडून शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा

गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहित यांच्यासह उपनिरीक्षक भास्कर गवळी, वाय. डी पवार, बी. एस. देवरे, विशाल काठे, गोरख साळुंके, संजय पोटिंदे, नितीन भामरे यांनी पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत खात्री केली. खात्री पडताच त्यांनी अनधिकृत गॅस भरणा केंद्रावर छापा मारला. संशयित केशव गबाजी घोडे (३२, रा. पंचशीलनगर) यास ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता संशयित फारुक सलीम शेख (३७, रा. गंजमाळ) अनधिकृतरीत्या गॅस भरणा केंद्र चालवत असल्याची माहिती समोर आली. पुढील कारवाई करत पोलिसांनी रिक्षा (एमएच- १५- एफयू- २१८२), (एमएच- १५- झेड- ९०९४), घरगुती गॅसचे २९ भरलेले सिलिंडर, १ रिकामे सिलिंडर तसेच एक इलेक्ट्रिक वजन काटा आणि दोन गॅस भरण्यासाठी वापरात येणारे यंत्र असे १ लाख ९१ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

पोलिस अधिकारी भास्कर गवळी यांच्या तक्रारीवरून दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवार (ता. १०) नानावली भागातील अशाच प्रकारचा अनधिकृत गॅस भरणा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच सलग बुधवार (ता.१२) तलवाडी भागातील दुसऱ्या अनधिकृत गॅस भरणा अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. भरवस्तीत अड्डा असल्याने भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता होती. सतर्क नागरिकांमुळे वेळीच कारवाई झाल्याने अनर्थ टळला.

हेही वाचा: SAKAL Exclusive : सावधान! 5G SIM Updateच्या नावाने बसतोय गंडा