Nashik : 5 थर लावत ‘भोईराज’च्या गोविंदांनी फोडली दहीहंडी | latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Govinda team of Bhoiraj Mandal breaking Dahi handi by laying five layers

Nashik : 5 थर लावत ‘भोईराज’च्या गोविंदांनी फोडली दहीहंडी

इंदिरानगर (जि. नाशिक) : गेली अनेक वर्ष दहीहंडीची परंपरा जपणाऱ्या चेतनानगर येथील श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला नाशिकमधील भोईराज मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने पाच थर लावत येथील हंडी फोडली. पथकाने सात थर लावण्याचीदेखील तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सहजरीत्या पाच थर लावून या पथकाने सहज ही हंडी फोडली. (Govinda of Bhoiraj broke Dahi Handi by applying 5 layers Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nandurbar : हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम सुरू

सुरवातीलाच सलामी देत उपस्थित शेकडो नागरिकांची त्यांनी वाहवा मिळविली. कोरोनामुळे दोन वर्षे स्थगित असलेल्या या दहीहंडी उत्सवाला चेतनानगर, इंदिरानगर, राजीवनगर, वासननगरसह सिडकोमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रांगणात हा महोत्सव रंगला.

सिडकोचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, माजी नगरसेवक आणि ट्रस्टचे संस्थापक अमोल जाधव, अप्पा बाविस्कर, प्रतिभा चौधरी, सागर देशमुख, माजी नगरसेविका संगीता जाधव, डॉ. पल्लवी जाधव, पूजा देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. भोईराज पथकाला रोख अकरा हजारांचे बक्षीस देण्यात आले.

दरम्यान, स्थानिक युवकांसाठीदेखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनादेखील रोख बक्षिसे देण्यात आली. या वेळी प्रथमेश विभूते, डॉ. विशाल जाधव, बाळकृष्ण शिरसाट, रमेश जगताप, योगेश कापडी, शैलेश कार्ले, अजय पाटील, अमेय जाधव, मानसी जाधव आदी उपस्थित होते. सह्याद्री युवक मंडळ, सह्याद्री व्यायामशाळा आणि हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या सदस्यांनी संयोजन केले.

हेही वाचा: राज्यात ४५ उपजिल्हाधिकारी, आता अप्पर जिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikfestival