सहा दिवसांत १५० लाभार्थ्यांची धान्य एटीएमला पसंती
जिल्ह्यात आणखी ११ एटीएम उभारण्याचा प्रस्ताव; सिंहस्थ कुंभमेळ्यातही होणार फायदा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२३ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य वितरण अधिक सुलभ करणाऱ्या नाशिक रोड येथील राज्यातील पहिल्या ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या सहा दिवसांत १५० लाभार्थ्यांनी या सुविधेतून धान्याची उचल केली आहे. या यशस्वी प्रयोगानंतर जिल्हा पुरवठा विभागाने नाशिक शहरात १० आणि येवला येथे एक, अशी आणखी ११ एटीएम उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
नाशिक रोड येथील जुन्या धान्य वितरण कार्यालयाच्या आवारात हे एटीएम सुरू करण्यात आले आहे. शनिवारपासून (ता. १७) लाभार्थ्यांना सोयीच्या वेळी धान्य उपलब्ध होत असल्याने या सुविधेला पसंती मिळत आहे. नव्या एटीएमचा प्रस्ताव लवकरच राज्याच्या पुरवठा विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यास पात्र लाभार्थ्यांना रेशन दुकानांतील रांगांपासून दिलासा मिळू शकतो.
सिंहस्थ कुंभमेळ्यातही उपयोग
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात आणखी १० एटीएम सुरू करण्याची तयारी आहे. राज्यस्तरावरून मंजुरी आणि आवश्यक पाठबळ मिळाल्यास पुढील तीन ते चार महिन्यांत ही सुविधा सुरू होऊ शकते. त्यामुळे स्थानिक पात्र लाभार्थ्यांसह कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांना धान्य उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्थेला मदत होईल.
धान्य वितरण होणार अधिक पारदर्शक
राज्य सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ई-पॉस यंत्रणा, आधार प्रमाणीकरण आणि डिजिटल नोंदींच्या आधारे धान्य वितरणात पारदर्शकता वाढविण्याचा उद्देश आहे. एटीएममुळे धान्य वितरणातील अनावश्यक टप्पे कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.