Nashik News | पावसाच्या अंदाजाने द्राक्ष उत्पादक धास्तावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grape

नाशिक | पावसाच्या अंदाजाने द्राक्ष उत्पादक धास्तावले

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कर्नाटक किनारपट्टीजवळील पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र येत्या ४८ तासांत पश्‍चिम-उत्तर पश्‍चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यातून तयार होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचापर्यंत आहे. त्याच्या प्रभावामुळे येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.

दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बागलाण, चांदवड, कळवण, येवला, निफाड, लासलगाव, सिन्नर, दिंडोरी या भागात आजपासून २१ नोव्हेंबरपर्यंत विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र अभ्यासकांनी वर्तविली आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १७) सायंकाळी नाशिकमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यातील जल, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, वाळवा, पलूस, मिरज या भागात, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ या भागात, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, बोरी, नारायणगाव, कळंब व सातारा जिल्ह्यातील फलटण, खटाव, पाटण, महाबळेश्‍वर या भागात गुरुवारी (ता. १८) आणि २१ ते २२ नोव्हेंबरला विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक | दुर्दैवी! दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

६७५ कोटींचा शेतकऱ्यांना भुर्दंड

राज्यात साडेचार लाख एकरावर द्राक्षांच्या बागा आहेत. त्यातील बागलाण (नाशिक), फलटण, बोरी, बारामती अशा भागातील सर्वसाधारणपणे २५ ते ३० हजार एकर बागांमधील द्राक्षे काढणीला आली आहेत. अशा भागात पाऊस झाल्याने घडांमधील मणी तडकण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. याशिवाय फुलोऱ्याची सुरवात अवस्था ते फुलोऱ्यात पोचलेल्या द्राक्षबागांमध्ये रात्रीच्या वेळी पाऊस झाल्यास नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. हवामानातील बिघाडामुळे शेतकऱ्यांना बागांवर फवारणीसाठी दहा ते १५ हजार रुपये खर्च करावे लागतील. राज्यातील बागा आणि त्यावर कराव्या लागणाऱ्या फवारणीचा विचार करता, शेतकऱ्यांना ६७५ कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

हवामानातील बदलामुळे काढणी सुरू असलेल्या द्राक्षांच्या बागांमधील घडांच्या मण्यांमध्ये १७ ते १८ ब्रिक्सऐवजी १४ ते १५ ब्रिक्स साखर उतरली, तरीही शेतकरी विक्रीसाठी घड काढू लागले आहेत. अशा द्राक्षांना निर्यातदारांकडून पैसे मिळताहेत. पण, प्रत्यक्षात अशी द्राक्षे बाजारात गेली आणि परदेशात कमी पैसे मिळाल्यास त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे.
-कैलास भोसले (महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघ)

हेही वाचा: नाशिक : महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

loading image
go to top