द्राक्षांच्या १० हजार कोटींच्या अर्थकारणाला कोरोनाचा घोर! दीड लाख टनांहून अधिक निर्यात बाकी

sakal (77).jpg
sakal (77).jpg

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव वाढत असल्याने राज्यातील द्राक्षपंढरीतील १० हजार कोटींच्या अर्थकारणाचा घोर वाढला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत राज्यातून ३५ हजार ७३ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. अजून दीड लाख टनांहून अधिक द्राक्षांची निर्यात बाकी आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना १ हजार ९०० कोटींचा फटका बसला होता. 

मागील लॉकडाऊनमध्ये १ हजार ९०० कोटींचा फटका 
राज्यात साडेतीन लाख एकरावर द्राक्षांच्या बागा फुलल्या आहेत. अवकाळी आणि गारपीटीच्या दणक्यातून वाचलेल्या बागांमधील द्राक्षांची निर्यातीसाठी काढणी वेगाने सुरु झाली आहे. युरोपमध्ये ७०० आणि इतर देशांमध्ये २०० असे एकुण ९०० कंटेनरभर द्राक्षांची आठवड्याला निर्यात होऊ लागली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत ३६ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्याहून आतापर्यंत अधिक निर्यात होऊ शकली असती. परंतु, गेल्या आठवड्यातील गारपीटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढणी थांबवली होती. गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू झाले असताना निर्यातक्षम द्राक्षांची चाळीस टक्के काढणी झाली होती. त्यातील जवळपास चार हजार कंटेनरभर द्राक्षे जागतिक बाजारपेठेत पोचली असताना भाव कोसळले.

दीड लाख टनांहून अधिक निर्यात बाकी;

त्यानंतर चार हजार कंटेनरभर द्राक्षांची काढणी झाल्यावर स्थानिक बाजारपेठेत मिळेल त्या भावाने द्राक्षांची विक्री शेतकऱ्यांना करावी लागली होती. सर्वसाधारपणे एका कंटेनरमध्ये वीस लाख रुपयांची द्राक्षे बसतात. जागतिक बाजारपेठेत भाव कोसळल्याने बाराशे कोटी आणि देशांतर्गत बाजारपेठेत किलोला ३५ ते ४० रुपयांऐवजी दहा ते बारा रुपयांना विकावी लागल्याने ७०० कोटींचा फटका शेतकऱ्यांना गेल्यावर्षीच्या हंगामात बसला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेल्या १ हजार ३५० कोटींच्या फटक्याचा समावेश आहे. 

५० दिवस चालणार हंगाम 
बागांमध्ये आणखी ७५ टक्के द्राक्षांची काढणी होणे बाकी आहे. येत्या ५० दिवसांमध्ये हा द्राक्षांचा हंगाम चालणार आहे. अशा काळात विक्री व्यवस्थेची साखळी विस्कळीत झाल्यास द्राक्ष पंढरी कोसळून पडण्याच्या भीतीचा गोळा शेतकऱ्यांच्या पोटात उठला आहे. गेल्यावर्षी निर्यातक्षम द्राक्षांसाठी किलोला सरासरी ७५ रुपये भाव मिळत होता. यंदा हाच भाव दहा रुपयांनी कमी होऊन ६५ रुपये झाला आहे. याशिवाय स्थानिक बाजारपेठेत २५ ते ३० रुपये किलो भावाने द्राक्षे विकली जात आहेत. सध्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाची खबरदारी घेऊन शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या काढणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आता शेतकऱ्यांना साथ हवीय ती म्हणजे, सरकारची. 

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र 
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून संभाव्य परिस्थितीत द्राक्ष विक्री व्यवस्थेसाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबवून परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. ‘अपेडा‘ने दिलेल्या सूचनांप्रमाणे पॅक हाऊसमध्ये कोरोना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या परिसरात बाहेरच्या व्यक्तीचा संपर्क येत नाही. शिवाय द्राक्ष बागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांबाबत काळजी घेतली जात आहे. बेदाणा प्रक्रिया, त्यासाठी काम करणारे आणि शीतगृहातील मजूर उपाययोजना करताहेत. या बाबींकडे संघाने सरकारचे लक्ष वेधले आहे. याशिवाय संघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे द्राक्ष उत्पादकांची बाजू मांडण्यासाठी दिंडोरीच्या भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांना याचसंदर्भातील निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघाचे खजिनदार कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, मानद सचिव अरुण मोरे, बाळासाहेब गडाख, रावसाहेब रायते आदी उपस्थित होते. 

द्राक्ष उत्पादकांच्या सरकारकडून अपेक्षा 

(संभाव्य लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर) 
० द्राक्ष निर्यातीसाठी आवश्‍यक उर्वरित कीटकनाश अंशाची तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करुन त्या सुरु ठेवाव्यात 
० वायनरी, बेदाणा उद्योग आणि प्रक्रियांसाठी लागणाऱ्या रसायन निर्मिती कारखाने सुरु राहण्याची परवानगी मिळावी 
० फळे-भाजीपाला बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारे पॅकिंग साहित्य, कॅरेट, कोरोगेटेड बॉक्स, प्लास्टिक कॅरेट, वूडन पॅलेटस, लाईनर बॅग, ग्रेपगार्ड पेपर आदी बाबींचा तुटवडा होऊ नये म्हणून संभाव्य लॉकडाऊनमधून उत्पादक आणि कंपन्यांना वगळावे 
० फळांचा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश करत असताना वाहतुकीसाठी परवानगीची माहिती वाहतूक पोलिसांना दिली जावी 
० मजुरांच्या वाहतुकीसाठी परवानगी कायम राहावी 
० ताज्या द्राक्षांच्या वाहतुकीसाठी राष्ट्रीय परवाना दिला जावा. त्याचवेळी राज्यांच्या सीमेवर यासंबंधाने सूचना दिल्या जाव्यात 
 

राज्यातून आतापर्यंत झालेल्या द्राक्षांच्या निर्यातीत सर्वाधिक निर्यात ही नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. ३२ हजार ७८६ टनाची ही निर्यात असून सांगलीतून १ हजार ४६५, सातारामधून ६३८, पुण्यातून ९०, नगरमधून ५२ आणि उस्मानाबादमधून ४० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाची खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे द्राक्षांची निर्यात आणि देशातंर्गत बाजारपेठेतील विक्री व्यवस्था सुरळीत राहील यादृष्टीने उपाययोजना करणे महत्वाचे आहे. 
- विलास शिंदे (अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) 

मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र सरकारने द्राक्षांच्या विक्री व्यवस्थेसाठी मदत केली होती. यंदाच्या हंगामात कोरोना विषाणू संसर्ग वाढीस लागल्याने निर्बंध घालण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात कठोर निर्णय घेण्याची आवश्‍यकता भासल्यास सरकारने द्राक्ष उत्पादकांना गेल्यावर्षीप्रमाणे मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे. 
- कैलास भोसले (खजिनदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com