esakal | ग्राउंड रिपोर्ट : राज्याच्या सीमा बनल्या कोरोना स्प्रेडर्स

बोलून बातमी शोधा

surgana border
ग्राउंड रिपोर्ट : राज्याच्या सीमा बनल्या कोरोना स्प्रेडर्स
sakal_logo
By
टीम सकाळ

नाशिक : कोरोना विषाणू संसर्ग (corona virus) फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने (state government) जिल्हाबंदी (lockdown) जाहीर केली असली, तरीही कागदी घोडे नाचविण्यात यंत्रणा मश्गूल असल्याने गुजरातचा सीमावर्ती भाग कोरोना स्प्रेडर्स (corona spreader) बनला आहे. वलसाडमधून (valsad) होणाऱ्या संसर्गाच्या प्रसारामुळे सुरगाण्यातील (surgana)रघतविहीर, बर्डीपाडा, पिंपळसोंड, उंबरपाडा, मांधा, दोडीपाडा, खुंटविहीर, आंबूपाडा, बाऱ्हे अशी गावे बाधित झाली. सुरगाण्यासह पेठमधील सीमावर्ती भागातील जिल्हाबंदी धोरणाच्या नेमक्या स्थितीचा ‘सकाळ’च्या बातमीदारांनी घेतलेला हा आढावा... (sakal ground report)

पहिल्या लाटेतील सुरक्षित गावे असुरक्षित

रतन चौधरी : सकाळ वृत्तसेवा (रिपोर्ट)

सुरगाणा : गुजरातच्या सीमेवर तालुका... बोरगावजवळ ठाणापाडा, सुरगाणा शहराजवळील तळपाडा, श्रीभुवन, करंजूल (सु.), राक्षसभुवन, उंबरठाणजवळ निंबारपाडा, रघतविहीर, खुंटविहीर, हडकाईचोंड, पिंपळसोंड, सागपाडा (खो.), भाटी ही गावे गुजरातच्या सीमेलगतची. ये-जा करण्यासाठी ई-पास घ्यायला हवा असा निर्णय राज्य सरकारचा. मात्र सीमेलगत कोरोना रोखण्यासाठीची नाकाबंदी कागदी घोडे नाचविण्यासाठी फार्स ठरलीय. सुरगाणा शहराजवळील तळपाडा येथे नाकाबंदी करण्यात आलेली नाही. गुजरातमध्ये प्रवेश सहज मिळत नाही, इथून जवळच म्हाळुंगा येथे नाकाबंदी केल्याचे आढळून आले. वन विभाग, आरोग्य, गृहरक्षक दल, पोलिस, ग्रामरक्षक दल अशी नऊ जणांची ‘टीम’ गुजरात सीमेवर आढळून आली. महाराष्ट्राच्या सीमेवर मात्र सारे कसे आलबेल आहे. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ या उक्तीची आठवण येते.

करंजूल (सु.), खुंटविहीर, बर्डीपाडा, रघतविहीर, हडकाईचोंड, पिंपळसोंड, निंबारपाडा, श्रीभुवन येथे, तर राज्याच्या सीमेवर नाकाबंदीची कोणती व्यवस्था पाहावयास मिळाली नाही. राक्षसभुवन येथे वन विभागाच्या वनउपज तपासणी नाक्यावर एक गृहरक्षक दल जवान, दोन गुरुजन सेवा बजावत होते. येथे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक एका वहीत लिहून घेतले जात होते. तसेच तापमान गन व ऑक्सिमीटरचा वापर केला जात असल्याचे आढळले. कोणत्याही प्रकारची कोरोनाची चाचणी केली जात असल्याचे आढळले नाही. वणी-सापुतारा राज्य महामार्गावर ठाणापाडा येथे नाकाबंदी करण्यात आली असून, तेथे सावलीसाठी तंबू दिसले नाहीत. वाहने अडवून केवळ थातुरमातुर चौकशी करून वाहनांना सहजपणे जिल्ह्यात प्रवेश दिला जातो.

surgana border

surgana border

surgana border

सीमा एकीकडे अन् नाकाबंदी-बंदोबस्त भलतीकडे

उंबरठाणजवळील निंबारपाडा येथे राज्याची हद्द असून, नाकाबंदी उंबरठाण गावात केलेली दिसली, तर गुजरातला जोडणाऱ्या उंबरठाण-वासदा रस्त्यावर बर्डीपाडा येथे नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली नाही. मात्र लगतच गुजरात सीमेवर बिलमोडा येथे कडक बंदोबस्तात आठ ते नऊ जण तैनात असल्याचे आढळून आले. ‘ग्राउंड रिपोर्ट’साठी गेल्यावर ओळखपत्र आणि कोरोना चाचणी अहवाल दाखविण्याची मागणी केली गेली. सुरगाणा शहरात माणी रस्ता, उंबरठाण रस्ता, वणी रस्ता अशी तीन ठिकाणी केवळ दिखाऊपणाची नाकाबंदी आहे. गुजरातच्या सीमेवर पोलिस शिपाई, वन विभाग, आरोग्य कर्मचारी, गृहरक्षक दल अशी चोख बंदोबस्ताची गरज आहे. त्यामध्ये बोरगाव ठाणापाडा, बर्डीपाडा, राक्षसभुवन या तीन ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी या पथकाची आवश्यकता आहे, असे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

surgana border

surgana

व्यावसायिक चुकवतात विचारपूसचा ससेमिरा

रखमाजी सुपारे : सकाळ वृत्तसेवा (रिपोर्ट)

पेठ : पेठपासून जवळपास दहा किलोमीटरहून अधिक अंतरावरील पिठुंडी. इथल्या तपासणी नाक्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जाते. लॉकडाउनमुळे वाहनांची वर्दळ मंदावली असून, दिवसाला २० ते २५ चारचाकी वाहनांमधून प्रवास करणारे आढळतात. शिवाय धरमपूर, वापी, वलसाड, चिखली या गुजरातमधील भागासाठी इथून दररोज भाजीपाला, दुधाची वाहने जातात. पण ई-पास अथवा कोरोना चाचणी न करता जाणारे दहा ते पंधरा चारचाकी वाहनांमधील प्रवाशांना दिवसभरात परतावे लागते. कोरोना चाचणीसाठी कुंभाळी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा पेठच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. चाचणीचा अहवाल येण्यासाठी अवधी लागत असल्याने चाचणी करून येतो म्हणणाऱ्यांपैकी एक जणही परत येत नसल्याचे इथल्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांचा अनुभव आहे. हे जरी एकीकडे असले, तरीही गुजरातमधील व्यावसायिक विचारपूसचा ससेमिरा चुकून हुलकावणी देत असल्याचे या भागातील आदिवासी बांधवांना दिसून येते.

भौगोलिकदृष्ट्या हा भाग डोंगराच्या उंचावर आहे. मुख्य रस्त्याच्या व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यात येता येत नाही. बंदोबस्तासाठी असलेल्यांसाठी येथे तंबू ठोकण्यात आला आहे. बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. ई-पास, कोरोना चाचणीचा अहवाल आदींची मागणी पोलिसांकडून वाहनचालकांकडे केली जाते. येथे दोन पोलिस, आरोग्यचे दोन कर्मचारी, दोन शिक्षक अशा सहा जणांवर तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नोंदवहीत वाहन क्रमांकासह कोरोना चाचणीची नोंद केली जाते. पेठ पोलिस ठाण्याचे फिरते पथक त्यावर लक्ष ठेवून आहे. सीमेजवळ महाराष्ट्रातील पेठ, तर गुजरातमधील सुतारपाडा ही दोन बाजारपेठांची गावे आहेत.

सुरगाणा तालुक्यातील स्थिती

० वाहनांची तपासणी जेमतेम. काही ठिकाणी शिक्षक व गृहरक्षक दलाच्या जवानांवर नाकाबंदीची मदार.

० दहापैकी चार वाहनांचे क्रमांक टिपले जातात नोंदवहीत.

० तंबू अथवा चौकीचा नाही मागमूस. सुरगाणा शहरात रस्त्यावर मंडपाचे लोखंडी अँगल आडवे. ० तपासणी दिवसा दहा ते सायंकाळी पाचपर्यंत. बेकायदा वाहनांसाठी सायंकाळनंतर रान मोकळे.

० गुजरातमधून सीमावर्ती भागातील गावांत आडरानाच्या पायवाटेने येता येते सहज. त्यामुळे बळावला कोरोनाचा फैलाव.

० सीमेवर चाचणीची सोय नसल्याने बोरगाव अथवा सुरगाण्यात पाठविले जाते.

० उंबरठाण हद्दीजवळील गुजरातच्या गावांमधून या भागात कोरोनाचा संसर्ग.

० गुजरातमधील प्रवेशाला सीमावर्ती भागातील गावांमधील ग्रामस्थांना बंदी.

० सीमावर्ती गावांत आरोग्य, शेती अवजारे, बी-बियाणे, खतांचा प्रश्‍न तयार.

० सीमेवरील बंदोबस्ताअभावी दमणचे मद्य राजरोसपणे पोचते गावांमध्ये.