
SAKAL EXCLUSIVE : सुरक्षित क्षेत्रात चार लाख विहिरी शक्य; भूजल सर्वेक्षणचा अहवाल
बाणगाव बुद्रुक : भूजलाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात अजून ३ लाख ८७,५०० विहिरी खोदणे शक्य होणार आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यातील सुरक्षित क्षेत्रातील गावात मनरेगाअंतर्गत विहिरीचा लाभ घेत बळीराजाचे बागायतदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात केवळ सुरक्षित वर्गवारीतील पाणलोट क्षेत्रातच सिंचन विहिरींना परवानगी दिली जाते.
राज्यातील काही भागात विहीर, खोदून जमिनीची अक्षरशः चाळण झाली आहे. पाणी पातळी खोल गेल्याने विहीर खोदूनही पाणी लागेल याची शाश्वती नसल्याने खर्च वाया जातो.
यामुळे आपल्या भागातील भूजल पातळीचा अभ्यास करूनच विहीर घेणे आवश्यक आहे, अन्यथा खर्च वाया जातो. मनरेगांतर्गत विहिरीचा लाभ घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण अहवाल महत्त्वाचा भाग मानला जातो. (Groundwater Survey Report Four lakh wells are possible in safe areas Sanctions have been received for wells in eleven and a half hundred villages in district under MGNREGA Nashik News)
महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल स्रोतांच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत.
शासन निर्णयानुसार अस्तित्वातील पेयजल स्रोतांच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहीर अनुज्ञेय करू नये व दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off झोन तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खासगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही असे सूचित केले आहे. यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यात ११४६ गावात विहिरी खोदण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.
हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
नाशिक जिल्ह्यात ११४६ गावांमध्ये विहीर खोदण्यास मंजुरी मिळाली असून नांदगाव तालुक्यात १०० गावांपैकी ७२ गावात वैयक्तिक विहीर व १९ गावात सामुदायिक विहीर खोदता येईल. ९ गावात विहीर खोदण्यास परवानगी नाही.
जिल्ह्यात क्षेत्र वर्गीकरण....
अतिशोषित क्षेत्र : १३
शोषित क्षेत्र : ०३
अंशतः शोषित क्षेत्र : १८
सुरक्षित क्षेत्र : ४६
"भूजल सर्वेक्षण अहवालानुसार नांदगाव तालुक्यात ७२ गावात वैयक्तिक व १९ गावात सामुदायिक विहिरी खोदण्यास परवानगी आहे. या सर्वेक्षणानुसार या गावातील शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत विहिरीचा लाभ घेता येईल."
- एस. डी. गोसावी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, नांदग
"मनरेगाअंतर्गत मी तीन वर्षांपासून विहीर मागणी प्रस्ताव सादर केला होता. भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणात आमचे गाव सेमी क्रिटीकलमध्ये आल्याने आम्हाला वैयक्तिक स्वरूपाची विहिरीचा लाभापासून वंचित राहावे लागले. नवीन सर्वेक्षणानुसार आमचे गाव सेफ झोनमध्ये आल्याने आता लाभ मिळणार आहे."
- किशोर देवकर, मनरेगा विहिरीचा वंचित लाभार्थी, बाणगाव बुद्रुक.