
Skeptical Attitude: नातेसंबंधात वाढतोय दुरावा; संशयी मनोवृत्तीला मानसशास्त्रीय समुपदेशनातून देऊया तिलांजली
नाशिक : बदलती जीवनशैली, वाढती व्यसनाधिनता, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर अन् मानसिक ताणतणाव या साऱ्यातून नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊन, त्याचे पर्यावसन कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
विशेषत: पती-पत्नीच्या नाजूक संबंधांमध्ये संशय निर्माण होऊन त्यातून टोकाच्या भूमिका घेत एकमेकांना संपविण्यापर्यंत प्रकरण पोचले आहेत.
संशयी मनोवृत्ती बळावण्यापूर्वीच जर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यावर समुपदेशनाचा मार्ग अवलंबण्यात आला तर, पुढे घडू पाहणाऱ्या कटू प्रसंगावर मात करणे शक्य असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. (Growing rift in relationships Lets give psychological mental illness counseling to skepticism nashik news)
नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वीच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केली तर, दुसऱ्या घटनेत मद्यपी नवऱ्याने रागाच्या भरात बेदम मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी नातवाने आपल्या आजीचा पैसे दिले नाहीत म्हणून खून केला.
अशाप्रकारच्या घटना अवतीभवतीच्या समाजामध्ये सातत्याने घडत आहेत. यातून समाजातील संयमी आणि सामंजस्याची मानसिकता खालावत असल्याचेच हे द्योतक असल्याचे मानले जाते आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याकडे पाहताना, नातेसंबंधामध्ये विश्वासाचा अभाव दिसून येतो आहे.
नाजूक स्वरूपाच्या नात्यांमध्ये संशयीवृत्ती वाढते आहे. प्रेमप्रकरण असो वा पती-पत्नी यांच्यात असलेल्या नाजूक नात्यांमध्येही संशयाचा वावर वाढला आहे. परिणामी हे संबंध टिकविण्यापेक्षा ते मिटविण्याकडे कल वाढतो आहे. ही बाब सामाजिक संरचनेच्या दृष्टिकोनातून घातक समजली जात आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
डिलिजियन्स (Delusions)
वास्तवात नसताना चारित्र्यावर संशय घेणे हे डिलिजियन्स या मानसिक आजाराचे लक्षण मानले जाते. आपल्या जीवनसाथीवर विश्वास न ठेवता सातत्याने त्याच्या प्रत्येक कृतीवर वा चारित्र्यावर संशय घेऊन कुटुंबात कटकटी होतात.
जर, वास्तवात असेल तर त्याबाबत त्या दाम्पत्याने परस्परांची संवाद साधून त्यावर मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने समुपदेशन केले तर त्यातून यथोचित मार्ग निघू शकतो. मात्र, बहुतांशी प्रकरणात टोकाची भूमिका घेतली जाते आणि जीवन संपविले जाते, जो अयोग्य असतो.
पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Paranoid personality disorder)
व्यसनाधीनतेतून निर्माण होणारा हा मानसिक आजार आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीमध्ये अकारण संशयीवृत्ती बळावते. आपल्याला हवे ते मिळायलाच पाहिजे अशी काहीशी आग्रही भूमिका घेतली जाते. त्यातून नको ते कृत्य हातून घडून जाते. यासंदर्भात वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला वा मार्गदर्शन घेतले गेले तर पुढचा अनर्थ टाळता येऊ शकतो.
सायकोसीस (Psychosis)
अलीकडे सोशल मीडियावर वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंगचे प्रकार होतात. विशेषत: प्रेमप्रकरण आणि दाम्पत्यांमध्ये पारदर्शकता नसेल तर यातून संशयीवृत्ती वाढण्याची दाट शक्यता असते. प्रत्यक्ष संवाद न साधल्याने यातून मानसिकता बिघडते आणि नातेसंबंध तुटतात. यासाठी समुपदेशन हा सर्वोत्तम मार्ग आहे.
"मानवी आयुष्य ताणतणावाने ग्रासलेले असताना त्यात कौटुंबिक कारणातून संशयीवृत्ती वाढणे हे मानसिक आजाराचेच लक्षण असते. यावर तज्ज्ञ मानसोपचाराकडून उपचार, औषधोपचार आणि समुपदेशन या पातळीवरून यशस्वीरीत्या उपचार शक्य आहेत. टोकाची पाऊल उचलून काहीही साध्य होत नाही. हे जरी प्रत्येकाने लक्षात घेतले तर मार्ग निघू शकतो."
- डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ