
शंकराचार्यसाठी स्वामी गोविंदानंद सरस्वतींचे नाव चर्चेत
नाशिक : किष्किंधा हनुमान ट्रस्टचे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचे नाव द्वारका पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्यपदासाठी चर्चेत आले आहेत. हनुमान जन्मस्थळ कर्नाटकमधील किष्किंधा आहे, असा दावा करण्यासाठी बुधवारी (ता. १) नाशिक रोडच्या महर्षी पंचायतन सिद्धपीठममध्ये झालेल्या संवादानंतर कॅमेरे बंद झाल्यावर पत्रकारांनी शंकराचार्यपदासाठी स्वामींना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी हसतमुखाने शंकराचार्य होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, सेवक म्हणून राहायला आवडेल, असे सांगून स्वामींनी आजपर्यंत अशा चर्चांचा आपणाला त्रास झाल्याचे नमूद केले.
हनुमान जन्मस्थळ किष्किंधा आहे हे सांगण्यासाठी स्वामी त्र्यंबकेश्वरमध्ये मुक्कामी का थांबले आणि नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभा घेण्याचे काय कारण, या प्रश्नांनी धार्मिक क्षेत्र ढवळून निघाले आहे. कुणी म्हणत होते, की कर्नाटक सरकारने किष्किंधा विकासासाठी शंभर कोटी दिले असून, केंद्र सरकारकडून बाराशे कोटी रुपये स्वामींना मिळवायचे आहेत.
अशातच, द्वारका पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्यपदावरून वादंग उठल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि स्वामी त्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चांना उधाण आले. पत्रकार परिषदेत स्वामींनी द्वारकेमध्ये जाऊन जगद्गुरू शंकराचार्य यांच्याशी किष्किंधा हनुमान जन्मस्थळाबद्दल बोलणार असल्याचा निर्वाळा दिला. शिवाय त्यांनी गुजरातकडे प्रस्थान ठेवले आहे. अशातच, आता बाराशे कोटींपैकी सहाशे कोटींचा निधी अंजनेरी (जि. नाशिक) येथील हनुमान जन्मस्थळासाठी मिळावा, असा आग्रह पुढे आला आहे.
पंतप्रधानांना देणार विनंतीपत्र
अयोध्येमधील रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हे ब्रह्मपुराणानुसार हनुमान जन्मस्थळ असल्याचे मान्य केले. त्यानंतर लगेच चर्चेत असलेल्या बाराशे कोटींपैकी सहाशे कोटी रुपये अंजनेरी विकासासाठी मिळावेत यासंबंधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा: हनुमान जन्मस्थळावरून वाद; साधू महंतांमध्ये 'रामायण'
नाशिकमधील गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र पुरोहित संघ आणि महर्षी पंचायतन सिद्धपीठमच्या माध्यमातून पंतप्रधानांना विनंतीपत्र देण्यात येणार आहे. ही जबाबदारी अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी उचलली आहे.
हेही वाचा: हनुमान जन्मस्थळासाठी पुराणाचा दाखला
दरम्यान, गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी त्यास दुजोरा दिला आहे. तसेच त्यांनी ही बाब नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना सांगितली. श्री. गोडसे यांच्याशी याबाबत संपर्क साधल्यावर त्यांनी केंद्र सरकारने बाराशे कोटींचा कसलाही निधी मंजूर केला नसल्याचे स्पष्ट केले. त्याच क्षणी श्री. शुक्ल यांनी बाराशे कोटींचा विकास निधी हा चर्चेतील विषय असल्याचे नमूद केले.
हेही वाचा: टिपू सुलतान कालखंडात शंकराचार्यांकडून अंजनेरीला मान्यता
Web Title: Hanuman Birthplace Anjaneri Controversy In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..