Health Department Recruitment : पीबी बीएसस्सी नर्सिंग उमेदवारांना डावलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Medical recruitment

Health Department Recruitment : पीबी बीएसस्सी नर्सिंग उमेदवारांना डावलले

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत नाशिक आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू असून, यासाठी पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

यामुळे विभागातील डावलण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत या उमेदवारांनी आरोग्य उपसंचालकांकडे विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने शेकडो उमेदवारांची नोकरीची संधी हिरावली गेल्याने त्यांच्यात असंतोष आहे. (Health Department Recruitment rejection to PB BSc Nursing candidates nashik news)

आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत राज्यात समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी बीएएमएस, बीएसस्सी नर्सिंग यासह पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी या तीनही अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार पात्र होते. मात्र यंदा पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यासाठी अपात्र ठरविण्यात आल्याने शेकडो उमेदवारांना धक्का बसला आहे.

या बाबत नाशिक विभागातून आलेल्या उमेदवारांनी नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांची भेट घेत त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे नोकरीपासून डावलण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये याबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Ayodhya Planning : शिंदे गटातही अयोध्या नियोजनाचा मान नाशिकला! ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न

"गेल्या वर्षापर्यंत समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग कोर्स केलेल्यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळी मात्र आम्हाला अपात्र ठरविण्यात आलेले आहे. अपात्र का ठरविले याचेही कारण देत नाहीत. त्यामुळे आम्ही सदरचा कोर्स करून चूक केली का? आम्हाला नोकरीची संधी का नाही?"- मयूरी बत्तीसे, उमेदवार.

"आम्हाला अपात्र ठरविल्याबाबत आरोग्य उपसंचालकांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. शासनाकडून तसा काही जीआर असेल तर तो दाखविला जात नाही. त्यामुळे हे मुद्दाम डावलले जात असल्याचे दिसते." - विशाल शिरसाठ

"समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग कोर्स असलेल्या उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्याचा निर्णय आरोग्य संचालक कार्यालयाकडून घेण्यात आलेला आहे. असे का, याबाबत संबंधित अधिकारीच सांगू शकतील."

- डॉ. कपिल आहेर, आरोग्य उपसंचालक, नाशिक विभाग.

हेही वाचा: Nandurbar News : तब्बल ३७ वर्षांनंतर प्रशासकराज! तळोदा पालिकेचा कारभार प्रशासकांकडे

टॅग्स :NashikHealth Department