ओल्या दुष्काळाऐवजी पंचनाम्याचा धडाका; राजू शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetti

ओल्या दुष्काळाऐवजी पंचनाम्याचा धडाका; राजू शेट्टी

मनमाड : नैसर्गिक आपत्तीत विमा कंपन्या दिवाळखोरीत निघायला हव्या असताना त्यांना कोट्यवधींचा नफा होत आहे. ईडी, सीबीआयमधून आपला बचाव कसा करायचा, यात मग्न असलेला विरोधीपक्ष, सध्या सुरू असलेले चिखलफेकीचे राजकारण आणि राज्य सरकारचा ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी सुरू असलेला पंचनाम्यांचा धडाका हे नाटक असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या वेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रभारी जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, की शेतकरी हताश झाला आहे. संतापलेला आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बीला उशीर झाला आहे. वर्ष कसे काढायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सर्वत्र सतत पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. सरकारने पंचनाम्यांचे नाटक बाजूला ठेवले पाहिजे. प्रशासनावर आणि विमा कंपन्यांवर सरकारचा वचक राहिलेला नाही. विमा कंपन्यांनी दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम द्यायला पाहिजे होती. पण ती दिली नाही.

काटामारीतून कोट्यवधींचा काळा पैसा

ऊस मोजताना काटामारी केली जात आहे. या काटामारीत सुमारे ४ हजार ६०० कोटी रुपयांची साखर तयार होते. यातून काळा पैसा तयार होतो. हा सगळा काळा पैसा निवडक दोनशे साखर कारखानदारांच्या घरात जात असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला. पेट्रोलपंपावरील प्रणालीप्रमाणे राज्यातल्या दोनशे कारखान्यांच्या वजनकाट्यांवर प्रणाली बसवली पाहिजे. साखर आयुक्तांच्या कार्यालयावर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.