
नाशिक : आठवडे बाजारावर धो धो पावसाचे पाणी
नाशिक : शहरात बुधवारी (ता. २२) अचानक आलेल्या पावसामुळे (Heavy Rain) आठवडेबाजारात ग्राहक, विक्रेत्यांची चांगलीच धांदल उडाली. (Heavy rain water in weekly market nashik monsoon news)
सकाळी ऊन पडल्यामुळे नेहमीप्रमाणे आठवडेबाजार गोदावरी नदीकाठी भरला होता. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मुसळधारेमुळे आठवडेबाजार विस्कळित झाला, तर पावसापासून संरक्षणाकरिता विक्रेते, ग्राहक आडोसा शोधत होते. तसेच विक्रीसाठी आणलेला माल ओला होऊ नये म्हणून धावपळ करीत होते.
या पावसामुळे बुधवारच्या बाजारात ग्राहक व विक्रेत्यांची चांगलीच धावपळ झाली. भाजी विक्रेते आपला माल व धान्याचे पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिक, बरदानाने झाकण्याचा प्रयत्न करीत होते, तर ग्राहक पाऊस कमी होताच घरची वाट धरत होते. गावाकडून आलेला शेतकरी आपला शेतमाल घेऊन गाडीत भरून निघण्याची तयारी करत होता. वाहून आलेल्या पाण्यामुळे नदीकाठचा परिसर जलमय झाला होता. त्यामुळे यातून वाट काढणारे दुचाकीस्वार व पायी जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच फजिती झाली.
हेही वाचा: पावसाळ्यातही 53 गावे-वस्त्यांची टँकर भागवताय तहान!
पावसामुळे मेन रोड झाले तळे
धो धो पावसामुळे मेन रोडवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांची चांगलीच कसरत झाली. मेन रोड वर्दळीचे ठिकाण असून, बुधवारी झालेल्या पावसामुळे मेन रोडवरील नाले, गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मेन रोडला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. दुचाकीवरून मार्ग काढताना नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पादचाऱ्यांना पाण्यापासून बचाव करताना चांगलीच कसरत करावी लागत होती. ओढ दिलेल्या पावसाने आणि सततच्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना मात्र दिलासा मिळाला.
हेही वाचा: नाशकात धो-धो : मुसळधार पावसाने नागरिकांची फजिती; पाहा Photos
Web Title: Heavy Rain Water In Weekly Market Nashik Monsoon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..