Tringalwadi Fort : ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ला, लेण्यांची दुरवस्था! पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tringalwadi Fort with historical heritage.

Tringalwadi Fort : ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ला, लेण्यांची दुरवस्था! पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील शिवकालीन ऐतिहासिक वारसा असणाऱ्या त्रिंगलवाडी गावाजवळ असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याजवळ असणाऱ्या डोंगराच्या कुशीतील २९ लेण्यांचा समूह आहे. परंतु पर्यटकांना या लेण्यांची पुरेशी माहिती मिळत नाही.

या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ऐतिहासिक वारसा असूनही केवळ पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे स्थळाला अवकळा आली आहे. पुरातत्त्व विभागाने कोणत्याही प्रकारची जबाबदारी पार न पडल्यामुळे लेण्यांना भग्नावस्था प्राप्त झाली, तर त्याचबरोबर येथील पायऱ्यांचीही दुरवस्था झाली आहे. (Historic Tringalwadi Fort Caves are in disrepair Neglect of Archeology Department nashik news)

किल्ल्याजवळ असणाऱ्या पाली भाषेत लिहिलेल्या शिलालेख व स्तूपांची झालेली दुरवस्था.

किल्ल्याजवळ असणाऱ्या पाली भाषेत लिहिलेल्या शिलालेख व स्तूपांची झालेली दुरवस्था.

येथील लेण्यांवर कोणत्याही प्रकारची वीजसुविधा, पिण्यायोग्य पाणी तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यातील शेवाळ व वणव्यामुळे दरवर्षी या लेण्या धोक्यात येत असतात. तसेच लेण्यात असलेले स्तूप झिजतात, तर लेण्यांच्या पायथ्याशी असलेले दोन स्तूप बेवारस स्थितीत पडलेले आहेत.

या लेण्यांमध्ये पाली भाषेत लिहिलेले शिलालेख असून, शिलालेखांची व स्तूपांची दुरवस्था झाल्याने त्यावरील लिखाण समजत नाही. कडक उन्हाळ्यातही येथील जलकुंडात पाणी असते. परंतु कुंडाचीही दुरवस्था झाली आहे. कुंडांची स्वच्छता करणे, गाळ काढणे अशी कामे न केल्याने कुंडात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या लेण्या कुंभोज वंशातील विष्णुपुलीत राजाच्या काळात खोदलेल्या आहेत. पहिल्या वरच्या स्तरात वीस आणि दुसऱ्या या स्तरात नऊ व उर्वरित अशी २९ लेणी आहेत. लेणी एकमध्ये भव्य सभागृह आहे. एका शिळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे.

सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पायाजवळ धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे. ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे, पाली भाषेतील शिलालेख, खोल्या, सभागृह, दालन, वाळूच्या घड्याळासारखी नक्षी, चैत्यगृह, ओटे, नक्षीकाम, लहान-मोठी प्रवेशद्वारे, भोजनगृह, स्तूप, दगडी पाण्याची टाके, प्रतिमा, दीर्घिका, स्तंभ, अर्धस्तंभ खांबावरती असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पाहावयास मिळते.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास :

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यावरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असावी. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

या लेण्या तीन भागांत आहेत. प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते. विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीखाली शिलालेख आहे. विहाराच्या चार खांबांपैकी तीन खांबांची पडझड झाली आहे.

पिण्याच्या पाण्याचे भुयारी टाके आहेत. त्याच्यावर सुंदर नक्षीकाम आढळते. शंकराचे मंदिर असून, कड्यावरून दक्षिणेस तळेगड, इगतपुरी, पूर्वेला कळसूबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, बसगड परिसर दिसतो. दरवाजाच्या उजवीकडे हनुमानाची मूर्ती कोरली आहे.

"राज्यात असणाऱ्या किल्ल्याचे अथवा लेणींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र वेळोवेळी मागणी करूनही विविध दुर्लक्षित किल्ले व लेण्यांचे संवर्धन करण्याकडेही पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष होत आहे. पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले नाही, तर हा पुरातन वारसा लोप पावेल."

- बिपीन गोडबोले, पर्यटक (मुंबई)

"ऐतिहासिक वारसांचे संवर्धन करणे ही शासनासह प्रत्येकाची जबाबदारी आहे. इगतपुरी तालुक्यातील अशा वारसास्थळांकडे लक्ष देणे गरजेचे असून, पर्यटकांना सोयी सुविधा मिळणे आवश्यक आहे. वारसास्थळांचे संवर्धन झाल्यास तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल." - भागीरथ मराडे, अध्यक्ष, कळसूबाई मित्रमंडळ, इगतपुरी