Soybean Prices Fall : लासलगाव, पिंपळगाव बसवंतला सोयाबीनच्या दरात घसरण; भाव 5 हजार रुपयांपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soybean auction going on at the Bazar Samiti grain market.

Soybean Prices Fall : लासलगाव, पिंपळगाव बसवंतला सोयाबीनच्या दरात घसरण; भाव 5 हजार रुपयांपर्यंत

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिलमध्ये सोयाबीनला साडेसात हजार मिळणारा दर आता पाच हजार रुपयांपर्यंत येऊन पोचल्याने सोयाबीन उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Soybean prices fall in Lasalgaon Pimpalgaon Baswant up to 5 thousand rupees nasihk news)

गेल्या वर्षातील एप्रिलमध्ये सोयाबीनची आवक कमी प्रमाणात येत असल्याने सोयाबीनला साडेसात हजार रुपये दर मिळाला होता.

मात्र राज्यातील बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने तसेच देशासह विदेशात सोयाबीनची डीओसी आणि तेलाला मागणी नसल्याने लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीच्या पालखेड मिरची येथील उपबाजार आवारात सोयाबीनच्या दरात घसरण होत सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

उत्पादनाच्या तुलनेत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडे बाजारभाव नसल्याने सोयाबीन मोठ्या प्रमाणात पडून आहे. येणाऱ्या दिवसांत दर वाढण्याची शक्यता कमी असून चार हजार ८०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दर राहतील, असे लासलगाव येथील धान्य व्यापारी व बाजार समितीचे माजी व्यापारी संचालक नंदकुमार डागा यांनी सांगितले.

सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत असल्याने सोयाबीनची लागवड केली. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. मात्र महागडी औषधे फवारणी करत पीक वाचवले. यातील सोयाबीन लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी आणले असता साडेचार हजार रुपये बाजारभाव मिळाला. यात उत्पादन, वाहतूक आणि मजुरीही निघत नसल्याने नाराज असल्याचे सोयाबीन उत्पादक शेतकरी अशोक सातपुते यांनी सांगितले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सोयाबीनच्या दरातील घसरण

एप्रिल २०२२- जास्तीत जास्त ७,५००, कमीत कमी तीन हजार, सरासरी सात हजार १६६ रुपये प्रतिक्विंटल

मे २०२२- जास्तीत जास्त सात हजार ६०, कमीत कमी दोन हजार ४०१, सरासरी सहा हजार ७८६ रुपये प्रतिक्विंटल

जुलै २०२२- जास्तीत जास्त सहा हजा ५९९, कमीत कमी तीन हजार, सरासरी सहा हजार २२१ रुपये प्रतिक्विंटल

सप्टेंबर २०२२- जास्तीत जास्त पाच हजार, कमीत कमी तीन हजार, सरासरी पाच हजार ३०३ रुपये प्रतिक्विंटल

जानेवारी २०२३- जास्तीत जास्त पाच हजार ३२५, कमीत कमी साडेतीन हजार, सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल