कर्करोगाशी लढा देणाऱ्या २५० जणांचा गौरव
विजेता उपक्रमातून मिळाली जगण्याची नवी उमेद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : कर्करोगावरील उपचारांपलीकडे जाऊन रुग्णांचे पुनर्वसन, भावनिक आधार आणि उत्तम जीवनमान मिळवून देणारी सर्वसमावेशक आधारव्यवस्था उभारण्याचा संकल्प होप-एमओसी कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने केला आहे. शनिवारी (ता.३१) आयोजित ‘विजेता कर्करोगाविरुद्ध खंबीर मन’ या विशेष उपक्रमात २५० हून अधिक कर्करोगमुक्त रुग्ण आणि त्यांच्या नातलगांचा गौरव करण्यात आला.
कर्करोगावर मात केलेल्या व्यक्तींच्या जिद्दीचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रवासात मोलाची साथ देणाऱ्या कुटुंबीयांच्या योगदानाची दखल घेणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. याप्रसंगी स्वतः कर्करोगाशी लढा देणाऱ्या अभिनेत्री मेधा मांजरेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीने उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा मिळाली. उपचारांनंतर नव्याने आयुष्य जगण्याची उमेद आणि या प्रवासातील अनुभव यावेळी कथन करण्यात आले. २०२६ मध्ये एमओसी कर्करोग उपचार केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विजेता’ उपक्रमाचे हे चौथे पुष्प होते. यापूर्वी मुंबई, पुणे, अहमदाबाद येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पेठे, डॉ. सोनल धांडे उपस्थित होते. डॉ. पेठे यांनी, कर्करोग उपचारांचा खरा उद्देश केवळ औषधोपचार नसून रुग्णांना अधिक काळ आणि आयुष्य जगण्यास मदत करणे हा आहे. भारतात कर्करोगाचा आर्थिक व मानसिक भार मोठा असल्याने वेळेवर निदान महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगितले. भविष्यात कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अधिक संघटित स्वरूपातील आधारव्यवस्था विकसित करण्याचा संस्थेचा मानस असून हा उपक्रम कर्करोगाचे निदान हा आयुष्यातील एक टप्पा असला, तरी त्यावरून संपूर्ण आयुष्याची व्याख्या होत नसल्याचा संदेश देतो.
------